Breaking News

बदलती जीवनशैली सर्वात मोठे संकट : डॉ. खानविलकर


अहमदनगर / प्रतिनिधी
शारीरिक, मानसिक,सामाजिक अध्यात्मिक  सुस्थिती आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असून आजच्या परिस्थितीत बदलती जीवनशैली हे सर्वात मोठे संकट आहे, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. वैजयंती खानविलकर व्यक्त केले.
येथील पी. एम. मुनोत मेमोरियल ट्रस्ट आयोजित 'डॉक्टर तुमच्या भेटीला' या उपक्रमांतर्गत 'बदलती जीवन शैली आपले आरोग्य'  या विषयावर आयोजित व्याख्यानाचा शुभारंभ व्याख्यात्या डॉ.  खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शरद मुनोत, जयश्री देवधर, पी. एम. शहा फौंडेशन पुणेचे चेतन गांधी, रमणलाल मेहेर, डॉ. विजय पितळे, आदेश चंगेडीया, गिरीष अग्रवाल आदी उपस्थित होते.
डॉ. खानविलकर म्हणाल्या, की आयुष्यात पैशाचे महत्व वाढले असून यांत्रिकीकरण, अनुकरण, ढासळती नितीमत्ता, मोबाईल, संगणक आक्रमण यामुळे जीवन रोगट बनत आहे. हे टाळायचे असेल तर शरीर मनसुस्थितीत असणे आवश्यक आहे. सतत उपचार पद्धती बदलू नका,गुगल म्हणजे डॉक्टर नव्हे, फेसबुक व्हाटसअपवरील सल्ले कृतीत आणण्याचे टाळा, अशा अनेक टिप्स डॉ. खानविलकर यांनी यावेळी दिल्या. स्वागत प्रास्ताविक शरद मुनोत यांनी केले. जयश्री देवधर यांनी व्याख्यात्या डॉ. खानविलकर यांचा परिचय करून दिला. सीमा राहुल मुनोत यांनी आभार मानले.