Breaking News

भारतीय तरुणाने शोधले ‘विक्रम लँडर’

नासाने पत्करली होती हार

नवी दिल्ली
अमेरिकन अंतराळ संस्थेने (नासा) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे जारी केली होती. चेन्नईच्या षण्मुगा सुब्रमण्यमने या छायाचित्रांवर भरपूर मेहनत घेतली आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान - 2 च्या विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोध लावला. षण्मुगाने नासाला याची माहिती दिली आणि त्यांनीही काही वेळातच याला पुष्टीही दिली. नासाने षण्मुगाचे आभार मानत त्याचे कौतुकही केले आहे.
भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-2 मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून 2.1 कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. षण्मुगा सुब्रमण्यम उर्फ शान मॅकेनिकल इंजिनिअर आणि कॉम्प्यूटर प्रोग्रामर आहे. सध्या तो चेन्नईतील लेनॉक्स इंडिया टेक्नालॉजी सेंटरमध्ये टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. 7 सप्टेंबर 2019 ला विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या हार्ड लँडिंगचा हा पैलू शोधून शानने मोठे योगदान दिले आहे. शान मदुराईत राहणारा असून त्याने यापूर्वी कॉग्निजंटसारख्या कंपन्यांमध्येही काम केले आहे. विक्रम लँडरच्या अवशेषांची माहिती घेण्यासाठी शानने नासाच्या लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटरद्वारे (एलआरओ) घेण्यात आलेल्या छायाचित्रांवर काम केले. हे छायाचित्र 17 सप्टेंबर, 12, 15 ऑक्टोबर आणि 11 नोव्हेंबर रोजी घेण्यात आले होते. शानने आपल्या या शोधाची माहिती नासाला दिली. नासाने काही वेळ घेत शानच्या शोधाला दुजोरा दिला. त्याच्या शोधाला दुजोरा देताना नासाचे एलआरओ मिशनचे जॉन केलर यांनी लिहिले की, विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोधासंबंधीच्या इ-मेलसाठी तुमचे आभार. एलओसी टीमने याची खातरजमा केली आहे. सांगण्यात आलेल्या लोकेशनवर लँडिंगच्या पूर्वीचे आणि नंतरच्या स्थितीत बदल दिसत आहे. नासा आणि एएसयूने याबाबत घोषणा करताना त्याला क्रेडिटही दिले. शानचे अभिनंदन करताना जॉन केलर पुढे म्हणाले की, तुम्ही भरपूर मेहनत आणि वेळ व्यतीत करुन जे काम केले, त्यासाठी शुभेच्छा. आम्ही जास्त वेळ घेतल्यामुळे तुमची माफी मागू इच्छितो. कारण याची घोषणा करण्यासाठी आम्हाला संपूर्णपणे संतुष्ट व्हायचे होते.


जिज्ञासेपोटी घेतला शोध : षण्मुगा सुब्रमण्यम
षण्मुगा सुब्रहमण्यम याने सांगितल्यानुसार, ‘विक्रम लँडर दुर्घटनाग्रस्त झाल्याने लोकांना त्याची माहिती घेण्याची उत्सुकता होती. जर विक्रम लँण्डर यशस्वीपणे लँड झाले असते तर लोकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली असती असे वाटत नाही. विक्रम लँण्डर दुर्घटनाग्रस्त झाल्याने आपल्यालाही त्याबद्दल माहिती मिळवावी असे वाटत होते. यानंतर आपण नासाचे फोटो जुन्या फोटोंना सोबत घेऊन निरीक्षण करण्यास सुरुवात केली असे षण्मुगा सुब्रहमण्यमने सांगितले आहे. मी शोध घेत असताना लँडिंग स्पॉटच्या उत्तरेच्या बाजूला पाहिले असता काही छोटे ठिपके दिसले. मी नऊ वर्षातल्या एलआरओ इमेजसोबत तुलना केली असता हाच विक्रम लँण्डरचा मलबा असल्याचे लक्षात आले. यानंतर मी नासाला कळवले, अशी माहिती षण्मुगा सुब्रहमण्यमने दिली आहे.