Breaking News

पाच वर्षात विकासकामांना खीळकोळगाव/ प्रतिनिधी :
गेल्या पाच वर्षात सत्तेवर नसताना तालुक्यातील अनेक विकासकामांना खिळ बसली. ज्यांना निवडून दिले त्यांनी बोलण्यापलीकडे काही केले नाही, अशी टीका आमदार बबनराव पाचपुते यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर केली.
श्रीगोंदे तालुक्यातील बोळेवस्तीवर  सुमारे 36 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष अशोक खेडके होते.
सभापती शहाजी हिरवे, बाळासाहेब महाडिक, नगरसेवक बापूसाहेब गोरे, एम. डी. शिंदे, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आमदार पाचपुते म्हणाले,  राहिलेल्या कामांना गती देवून विकासाचा अनुशेष भरुन काढणार आहे. पाच वर्षात तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहे. सत्ता नसताना सुद्धा विकासकामांना निधी आणून कामे केली. आता आपण लोकप्रतिधी असल्याने आणखी जास्तीतजास्त निधी उपलब्ध करुन विकास कामांना प्राधान्य देवून सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्यास कटीबध्द राहणार आहे. मंजूर केलेल्या कामात ठेकेदारांनी दर्जेदार काम करावे. चुकीचे काम झाल्यास कोणाची गय केली जाणार नाही, असाही इशारा पाचपुते यांनी दिला.
  अशोक खेंडके, बाळासाहेब महाडिक, बापू गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी शेळके यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.