Breaking News

नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई कोपरगाव / ता.प्रतिनिधी
 नायलॉन मांजाची विक्री केल्या प्रकरणी कोपरगाव शहरातील गोरोबानगर येथील विक्रेत्यावर कारवाई केली. रवींद्र अण्णा वाघ (वय-२७) असे विक्रेत्याचे नाव असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 
 चिनी तथा नायलॉन मांजा पतंगासाठी वापरल्याने या धाग्याने प्राणी, पशु, पक्षी यांना इजा पोहचून जीवितास धोका निर्माण होऊन प्रसंगी जीवही जातो. त्यामुळे मांजासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन धाग्यास राज्य शासनाने निर्णय क्रं. सी.आर.टी.२००५ /प्र. क्र./३७ ता./तां. क्रं.- दि. १८ जून २०१६ पासून प्रतिबंध घातलेला आहे. तरीही त्याची विक्री केली जात असल्याची बाब पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ (वय-३२) यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात ४१८/२०१९ भा..वि.कलम १८८.३३६ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई केली.
 दरम्यान कोपरगावात पंधरा दिवसांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांचा धारणगाव रस्त्यावर गळा कापला होता. तर कोपरगाव बेट भागात एका दुचाकी स्वाराचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. राज्यातही अशा अनेक घटना घडल्या होत्या. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याची परंपरा असून, हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्री वापर होताना दिसून येतो. त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षीमित्रांमधून केली जात आहे.