Breaking News

'सरस्वती'च्या काठाला शेवाळयुक्त पाण्याचा वेढा दशक्रिया विधी घाट घाणीच्या विळख्यात;नागरिकांची स्वच्छेतेची मागणी कोळगाव/प्रतिनिधी
 श्रीगोंदे नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या सरस्वती नदी काठावरील दशक्रिया विधी घाटाला शेवाळयुक्त गलिच्छ पाण्याने विळखा घातला आहे. दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने त्या ठिकाणी  मयत व्यक्तीच्या पुढील क्रियाकर्मांची अवहेलना होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 श्रीगोंदे शहरातील नगरपालिका हद्दीतील सरस्वती नदीच्या तीरावर श्रीगोंदा शहरातील तसेच परिसरातील दशक्रिया विधी अनेक वर्षापासून होत आहेत. याठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून दशक्रिया विधी घाटाचे बांधकाम तसेच सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात केले आहे. परंतु याठिकाणी सरस्वती नदी ही वाहत असल्याने तिच्या पाण्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेवाळ साठले असून या शेवाळामुळे दशक्रियाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने या ठिकाणी मयत व्यक्तीच्या दशक्रिया विधी करण्यासाठी साठी येणाऱ्या नातेवाईक, मित्र, पाहुणे, यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात बाहेर गावावरून येणारे दशक्रिया विधी बंद झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या घाट परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी श्रीगोंदा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


दुर्गंधीमुळे अवहेलना
 श्रीगोंदे शहरातून जाणाऱ्या सरस्वती नदीच्या काठावर असलेल्या दशक्रिया विधी घाट सुधारणेसाठी लाखो रुपये खर्च केले. पण दशक्रिया विधी ओट्याभोवती शेवाळयुक्त पाणी आहे. त्यामुळे काकस्पर्श होण्यासाठी पिंड मांडणे अवघड झाले. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मयतांच्या नातेवाईकांना नाक दाबून बसावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया दशक्रिया विधी साठी आलेल्या नातेवाईकांनी दिली.

  
सरस्वती नदीच्या पात्रात घाटा शेजारी बंधारा असल्याने तेथे पाण्याची साठवण होत होती.
मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्यावरील फळी काढल्याने त्या परिसरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. नदी पात्रातील शेवाळ तसेच पाणवनस्पती काढण्याचे काम सुरू केले आहे.
 - शुभांगी पोटे, नगराध्यक्ष, श्रीगोंदे

  
घाट परिसरातील बंधाऱ्याची एक फळी काढण्यात आली असून दुसरी फळीही काढण्याचे आदेश  दिले असून येत्या दोन दिवसात साठलेले घाणीच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर परिसर स्वच्छ केला जाईल.  -- अशोक खेंडके, उपनगराध्यक्ष, श्रीगोंदे


पालिकेने दशक्रियाचा घाट तयार करण्यासाठी लाखो खर्च केले. पण हा घाटाचा परिसर घाणीने माखला आहे. मात्र पालिका बघ्याची भूमिका घेत आहे. घाट स्वच्छ सुंदर करण्यासाठी पालिकेने लक्ष द्यावे.
-        दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, दक्ष नागरिक फाउंडेशन