Breaking News

निर्भया प्रकरणी दोषी आरोपीची फाशी कायम

पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीने सर्वोच्च न्यायालया पुनर्विचार याचिका दाखल केली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत, फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तीन सदस्यांच्या खंडपीठाने बुधवारी अक्षयच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केली. यावेळी सर्वोच्च न्ययालयाने ही याचिका फेटाळून लावत आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपींच्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने याआधीच फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, बचाव पक्षाद्वारे दिलेले युक्तिवाद यापूर्वी सुनावण्यात आले आहेत. याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा कोणताही आधार सापडलेला नाही असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या दोषींना फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोपींचे वकील एपी सिंह यांनी सुनावणी दरम्यान, याप्रकरणाचा तपास आणि पीडितेच्या जबाबावर प्रश्‍न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, पीडितेने शेवटच्या जबाबामध्ये आरोपी किंवा इतर दोषींचे नाव घेतले नाही. मीडिया आणि राजकिय दबावामुळे आरोपीला शिक्षा देण्यात आली. तो निर्दोष आणि गरीब आहे. भारत अहिंसेचा देश आहे आणि फाशी मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. यावर, कोर्टाने सांगितले आहे की तुम्ही  ठोस आणि कायदेशीर तथ्ये ठेवावीत. आमच्या निर्णयामध्ये काय उणीव आहे आणि का याचा पुनर्विचार करावा?, असा सवाल कोर्टाने केला आहे. यावेळी आरोपींच्या वकीलांनी तिहार तुरूंगाचे तुरूंग अधीक्षक सुनिल गुप्ता यांच्या पुस्तकाचा उल्लेखही करण्यात आला. त्याच्या वकीलांनी पुस्तकाचा उल्लेख करत एका आरोपच्या आत्महत्येवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यावेळी न्यायालयानंही यावर प्रतिक्रिया देत ट्रायल पूर्ण झाल्यानंतर यावर पुस्तक लिहिणं हा गंभीर ट्रेंड असल्याचं म्हटले. दरम्यान, आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. दिल्लीतील मुनिरका मध्ये बस स्टॅडरून मेडिकल विद्यार्थिनी निर्भयाचे 16 डिसेंबर 2012 रोजी अपहरण करून 6 लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर तिची वाईट अवस्था करत तिला रस्त्यावर फेकण्यात आले होते. घटनेच्या 13 दिवसांनंतर 29 डिसेंबर रोजी सिंगापूरच्या माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खालच्या सर्व न्यायालयांनी चारही आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे. यानंतर आता उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायलयाने देखील फाशीचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणातील 6 आरोपींपैकी एक राम सिंहनं तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. यातील एक अल्पवयीन होता. त्याला जुविनाईल जस्टिस बोर्डाने दोषी ठरवत 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. आरोपी किशोरला सुधारगृहात 3 वर्ष ठेवल्यानंतर सोडून देण्यात आले होते.