Breaking News

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ‘राज्य उत्पादन शुल्का’ची मोहीम

अहमदनगर/प्रतिनिधी : नाताळ व  नवीन वर्षाच्या शुभारंभासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पार्टी व इतर कार्यक्रम होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार व अधीक्षक पराग नवलकर तसेच उपअधीक्षक सी.पी. निकम यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री/निर्मिती/वाहतूक  यांना आळा घालण्याकरिता जिल्ह्यात 5 पथके व 2 भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
नगर विभागाचे विशेष पथकामार्फत रात्रीची गस्त घालण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व परवानाकक्ष अनुज्ञप्त्या व ढाबे यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे. नाताळ व नववर्षाच्या प्रारंभाच्या कालावधीत बर्‍याच वेळा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच)  ड्युटी फ्री स्कॉच या नावाने बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे अनुज्ञप्तीधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
अवैध व सार्वजनिक  ठिकाणी  मद्य प्राशन करताना आढळून आल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार तसेच ढाब्यांवर जागा मालकांविरुध्द गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणी करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त व बनावट मद्य अथवा अवैध मद्यविक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18208333333 हा टोल फ्री आणि 8422001133 या  व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे  राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.