Breaking News

कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज : मरकड


भाविनिमगाव/प्रतिनिधी
 यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून खरीप हंगाम हातचा गेला आहे. त्यामुळे चालू वर्षी घेतले कर्ज परतफेड होणार नसून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत दुरूस्ती करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून   थकबाकीचा नियम शिथिल करण्याची गरज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष  शरद मरकड यांनी व्यक्त केले.
  शेतकरी कर्जमाफी योजनेवर ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. मात्र शासनाने दोन लाखपर्यंत कर्जमाफीच्या घोषणेत जो थकबाकीचा नियम टाकला आहे त्यामुळे यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे जे अतोनात नुकसान झाले आहे ते शेतकरी कसे कर्ज भरणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. चालू वर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची नितांत गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी दुरूस्ती करून शासनाने कर्जमाफीतील थकबाकीचा नियम शिथिल करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असल्याचे मरकड यांनी यावेळी सांगितले.
 दरम्यान, सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सरकारने सातबारा कोरा करण्याच्या आश्वसानाची पूर्तता होत नसून अतिवृष्टीने सर्वच पिकांचे नुकसान हे जवळपास शंभर टक्के झाले असून ते शेतकरी कर्ज परतफेड करू शकत नाही त्यामुळे थकीत कर्जमाफीत चालू वर्षी पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा. तसे झाले नाही तर सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हे केवळ आश्वासनच  राहील. असे झाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा संघर्ष करेल असे शरद मरकड यांनी सांगितले.