Breaking News

आंबेडकरांच्या मार्गावरून भाजपाच्या हेतूला शह देणे शक्य!


*देशात सीएए, एनआरसी आणि एनपीआर या तीन्ही शब्दांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात याचे समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे काढून नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त होतांना दिसत आहे. परंतु धर्मनिरपेक्ष गांधीच्या देशात गांधी विचार कुठेही दिसत नाहीत.स्वच्छतेसारख्या मुद्यावर गांधींचा चष्मा असलेल्या जाहीरातींवर शेकडो कोटींचा खर्च केला जातो,मग विरोधाला प्रतिरोध करण्यासाठी बगलबच्यांकडून आंदोलन करवून घेण्याऐवजी जाहीरातीचे माध्यम वापरून सरकार गांधींच्याच चष्म्यातून जनतेतील संभ्रम का दुर करीत नाही.सरकारतर्फे जनप्रबोधनाच्या मुद्यावर मौन बाळगले जात असल्याने मनुवादाचा छुपा अजेंडा राबविला जात असल्याची जाणकारांची भिती संयुक्तिक वाटते.अशा परिस्थितीत केवळ विरोधासाठी विरोध न करता मुळावर घाव घालण्याची रणनिती अपेक्षित आहे,हे केवळ अॕड.प्रकाश आंबेडकर यांनाच समजले आहे.

 कुणी जगण्याला अक्षम असेल तर त्याला जगण्याला लायक बनविणे म्हणजेच ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ आणि यालाच गांधींची सर्वोदय, किंवा अहिंसा म्हणतात. आणि यालाच गांधी अहिंसेचे तत्व म्हणतात. व्यापक भावनेचा विकास करणे ही समाज धारणेला अनुकूल प्रक्रिया आहे. व्यापक भावना म्हणजे सामिल करून घेण्याची मनोवृत्ती, ही मनोवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न गांधींनी सामुदायिक प्रार्थनेत केला. गांधीच्या वेळी सांप्रदायिक प्रश्न फार महत्वाचा असल्यामुळे त्यांनी  ‘ईश्वर अल्ला तेरे नाम’ हा नविनच ‘नाम जपाचा’ प्रकार सामुदायिक प्रार्थनेत दाखल केला. आज याच ईश्वर आणि अल्लाहाच्या अनुयांयामध्ये आपल्या हक्काविषयी भांडण सुरू आहे. अर्थात यासाठी केवळ सत्ताधार्‍यांना जबाबदार धरणे योग्य होणार नाही. तर जे सत्तेत नाही म्हणून समाजात विद्वेश पसरवित आहेत हे सुध्दा जबाबदार आहेत. अतिशय सामान्य शब्द आहे लोकसंख्या गणना ( एनपीआर) नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) परंतु या शब्दाचा विपर्यास करून त्यातुन वेगवेगळे अर्थ लावून सत्तेत नसलेल्यांनी देशातील नागरीकांचा बुध्दीभेद करणे आणि सत्ताधार्‍यांनी त्याचा अर्थ, भूमिका, आवश्यकता यावर जनतेला विश्वासात न घेता अचानक लागू करणे या दोन्ही घटना समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत. या देशात हागणदारी मुक्त भारतचा संकल्प करण्यात आला. बाहेर उघड्यावर शौचाला न जाता शौचालयात जाण्याचा स्वच्छ भारताचा नारा देण्यात आला. परंतू दरवाजा बंद करो, साबणाने हात धुवा अशा जाहिराती पांच वर्षापर्यंत करण्यात आल्या. या देशाचा महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जाहिरातीच्या माध्यमातुन जनजागृती केली. ज्यामुळे  व्यक्तिगत आरोग्यासह सामाजिक आरोग्यही राखण्यास मदत होणार आहे. आणि त्यात देशातील नाागरीकांचे हित आहे. मग उघड्यावर शौचाला बसू नका हे सांगण्यासाठी करोडो रूपये खर्च करून चोवीस तास जाहीराती करण्यात आल्या. तर मग सीएए, एनआरसी एनपीआर यासाठी का जनजागृती करण्यात आली नाही ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि तो अगदीच अतार्किकही म्हणता येणार नाही.
सरकारच्या एकूण भुमिकेवर आणि त्यापेक्षाही या भुमिकेमागच्या हेतूवर  वारंवार संशय घेतला जातो.या संशयामागे जनतेला किंवा संसदीय लोकशाहीत कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेण्याचे धोरण कारणीभूत आहे.भाजपाला जनतेने विश्वासाने बहुमत दिले.याचा अर्थ त्यांनी मनमानी करावी असा मुळीच होत नाही.जनतेला विश्वास देणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे.कुठलाही निर्णय घेतांना जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकणे सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरू शकते.विद्यमान सरकारबाबत पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये हेच घडतांना दिसते आहे.जम्मू-काश्मिर मधील 370, 35 अ, तीन तलाक, राममंदिर यानंतर लागलीच एनआरसी कायदा लागू करण्याची घाई सरकारला का झाली ? असा प्रश्न बहुमत देणारी जनता स्वतःच्या मनाला विचारत आहे. सरकारचा निर्णय हा शुध्द हेतूने घेतला गेला नाही असा त्यातून अर्थ जनता आपल्या सोईप्रमाणे काढत आहे.  जनमनात प्रश्नांचे त्यायोगे संशयाचे काहूर माजले असतांना ते दुर करण्याऐवजी आपला अट्टाहास नव्हे दुराग्रह कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.त्यातच सरकारकडून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नसल्याने विरोधी पक्षानेही एनआरसी म्हणजे गरीबांवरील टॅक्स आहे अशा प्रकारचे आरोप सुरू करून संभ्रम आणखी वाढवला आहे. खरेतर सरकार आणि विरोधक या दोघांच्याही भुमिका   हास्यास्पद आहेत. सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर जनहिताच्यासाठी आक्षेप घेणे हे विरोधी पक्षाचे काम आहेच. त्यात शंका नाही. परंतु देशातील नागरिकांना चुकीच्या पध्दतीने बुध्दीभेद करून देशातील सामाजिक शांततेला बाधा पोहचवायची कृती निषेधार्हच आहे.
देश चालविणारा सत्ताधारी पक्ष हा जबाबदारीने वागला नाही तर देशाची अधोगती व्हायला वेळ लागत नाही. देशाची अर्थव्यवस्था, रोजगार पूर्णपणे ढासळत असतांना अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करणारे मुद्दे सरकारने उकरून काढण्याची गरज नाही. यातून व्होटबँक वाढत नसते. तर लोकप्रियता कमी होत असते. अल्पबुध्दी आणि अंधभक्ताच्या समर्थनाने सरकारची लोकप्रियता वाढत नसते. मुर्खाची जमात रामायण, महाभारत काळात देखील होती. ती आजही आहे. म्हणून मुर्खाच्या बाजारात फिरण्यापेक्षा बुध्दीवंताच्या बैठकीत बसलेले केव्हाही हिताचे असते. देशात पसरलेली अशांतता, सामाजिक द्वेषभावना तात्काळ थांबली पाहिजे. कायदे करा, परंतु त्यातून संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची असते, याचे भान ठेवा. सत्तेच्या उन्मादात हुकूमशहा देखील गाडले गेले. हा इतिहास आहे. त्यामुळे या देशाची धर्मनिरपेक्ष, प्रतिमा कायम ठेवण्याच्या दृष्टिने सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. अहंकारातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. देश शांत करण्याची भूमिका विरोधी पक्षाने घेण्याचीही आवश्यकता आहे. गांधीच्या नावाचा उपयोग केवळ राजकारणासाठी करू नका तर गांधीची ‘सर्वोदय’ भावना समजूनही घ्या.अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे.ही अपेक्षा आतापर्यंत पुर्ण झाली नाही सरकारची एकुण वाटचाल लक्षात घेता भविष्यातही ती पुर्ण होईल अशी सुतराम शक्यता दिसत नाही.
सरकारच्या हेतूविषयी विरोधकांनी भानावर यायला हवं डावपेच नीट समजून घ्यायला हवेत.केवळ भाजप विरोधासाठी सरकारच्या निर्णयाविरूध्द आंदोलन करणे हेतू दुर्लक्षित करून करणे कायमची घोडचुक ठरू शकते ही बाब एकाही विरोधकाच्या लक्षात आलेली दिसत नाही.अपवाद केवळ अॕड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा.सरकारच्या वाटचाली मागचा छुपा अजेंडा आंबेडकरांच्या नेमका लक्षात आल्याने  या मुद्यावर त्यांनी रणनिती आखली आहे.CAA, NRC आणि NPR या मनुवाद्यांनी हुशारीने इथल्या बहुसंख्यांक समाजासाठी रचलेल्या     रहस्यमय ञिकोणाला राजकीयदृष्ट्या अतिशय हुशारीने जर कोणी महाराष्ट्रात एक्स्पोज करत असेल, तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. अत्यंत तर्कशुद्ध आणि त्याचवेळी कल्पक पद्धतीने ते मनुवाद्यांचा अजेंडा लोकांसमोर आणत आहेत. त्यांची दादरची सभा आणि आंदोलन याचा उत्तम उदाहरण आहे.सभेच्या ठिकाणी गोंधळी, डोंबारी, मातंग समाजातील तरुण पुरुष व स्त्रिया आवर्जून उपस्थित होत्या. NRC हा याच उपेक्षित, मागास समाजावर अन्याय करणारा, त्यांचे मुळ अधिकार हिरावून घेणारा कायदा ठरणार आहे. आसाम मध्ये हेच झालं. उर्वरित देशात तेच होईल.प्रकाश   आंबेडकरांनी जाणीवपूर्वक या समाजाच्या हलाखीचा आणि त्यातून त्यांच्याकडे कागदपत्रे नसण्याचा मुद्दा अधोरेखित केला. इथला बहुजन समाज भाजप किंवा संघ सोडाच, पण मनुवादाच्या जन्माच्या आधीपासून या देशात राहतोय. त्यांच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे मागणं हा एक कटाचाच भाग आहे.
आंबेडकर एका तडफेने आणि आक्रमकपणे हे कटकारस्थान उलगडून सांगत आहेत. भाजपला मी खोटा असेन तर मला अटक करा असं आव्हान देत आहेत. महाराष्ट्रभर त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांना मोठा प्रतिसाद मिळेल.राज्यात बिगर राजकीय मंडळींनी मोदी सरकारच्या विरोधात चांगली आंदोलनं चालवली आहेत. आणखी काही होऊ घातली आहेत. पण राजकीय नेतृत्वाखाली सर्वोत्तम आणि नेमकं आंदोलन आंबेडकरांनीच केलं ही निखळ वस्तुस्थिती आहे.इतरांनी त्यांचा मार्ग अनुकरणे हाच या ज्वलंत समस्येवर ठाम उपाय आहे.