Breaking News

मधुमेहावर सहजपणे मात करून जीवनाचा आनंद घ्यावा : डॉ.गोपाळ बहुरूपी

अहमदनगर : मधुमेहावर सहजपणे मात करून जीवनाचा आनंद घ्या,असे आवाहन डॉ.गोपाळ बहुरूपी यांनी केले.सर्वज्ञ मेडिकल फाउंडेशन,डॉ.गोपाळ बहुरूपी एकॅडमी ऑफ मेडिकल एज्युकेशन अँ लर्निंग एक्स लेन्स व न्युक्लिअस हॉस्पिटल अण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सावेडीमधील माऊली संकुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.जिल्हा न्यायाधीश अविनाश कुलकर्णी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, रमेश गुगळे, सतीश बोरा,दगडूमामा पवार,उदय कराळे व प्रा.हर्षल आगळे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्व लनाने मार्गदर्शन शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला.
डॉ.गोपाळ बहुरूपी म्हणाले,आपल्या देशामध्ये मधुमेहाच्या रूग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेह या आजाराने केवळ वयस्कर मंडळींच नव्हे तर तरूणही ग्रासले जात असल्याचे दिसू लागले आहे.श्रीमंतांनाच नव्हे तर गरिबां नाही मधुमेहाने ग्रासले आहे.नोकरवर्गालाच नव्हे तर शेतकरीबांधवांनाही मधुमेहाने ग्रासले आहे. या आजाराचे प्रमाण वाढण्याचे एकमेव कारण व्यायामाचा अभाव हेच आहे.कष्टाची, शारिरीक मेहनतीची कामे करण्याचे प्रमाण जसजसे कमी होत चालले तसतसे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे जाणवू लागले आहे. बदललेली जीवनशैली म्हणजेच अवेळी जेवण,लठ्ठपणा,वाईट सवयी ही मुख्यत्वे मधुमेह होण्याची कारणे आहेत. मधुमेहाचा आजार बरा करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम, वेळच्या वेळी वैद्यकिय तपासणी आणि डॉक्टरांची नियमित भेट ही चतुसूत्री उपयुक्त ठरते,असे सांगून डॉ.गोपाळ बहुरूपी पुढे म्हणाले, आहारात गूळ, साखर, मध हे केवळ गोड पदार्थ नसावेत. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जास्त प्रमाणात असावा. प्रथिनयुक्त पदार्थ खावेत. दूध, दही, पनीर असावे. केळी, आंबे, चिक्कू,सिताफळ ही  फळे सोडून इतर फळे खावीत. फळे आणि हिरव्या पालेभाज्या म्हणजे फायबर होय. आहारात या फायबरचे प्रमाण अधिक असावे. व्यायाम करताना चालणे, धावणे, पोहणे या एरोबिक्सवर भर द्यावा. वजन उचलणे, योगासने असा शारिरीक लवचिकतेस योग्य व्यायाम नियमितपणे करावा. एचबीए 1 सी, लिपिड प्रोफाईल, क्रिएटिनाईन यासह डोळ्यांच्या तपासण्या करून घ्याव्यात.या तपासण्या नियमित केल्यास मधुमेहाशी निगडित असलेली गुंतागुंत थांबवता येऊ शकते. डॉ.गोपाळ बहुरूपी यांनी मधुमेह आजारावर मात करण्यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने दिलेली सचित्र माहिती उपस्थितांना भारावून टाकणारी ठरली. डॉ. सुधीर बोरकर यांनी मधुमेह होऊच नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे अत्यंत प्रभावीपणे सांगितले. डॉ. चेतना बहुरूपी यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन करताना न्युक्लिअस हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटरतर्फे प्रती 6 महिन्याला आयोजित केल्या जात असलेल्या या शिबिराचा गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मनमोहन बहुरूपी यांनी आभार मानले. प्रा. हर्षल आगळे यांच्या प्रोत्साहनामुळे प्रथम संस्थेच्या हेल्थ केअर सेंटरमधील विद्यार्थीनींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराचा लाभ सुमारे 1100 जणांनी घेतला.