Breaking News

नियोजनाच्या अभावामुळे कर्जतला वाहतूक कोंडी
 कर्जत/प्रतिनिधी
  कर्जत शहरात वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. वाहतुकीतील नियोजनाचा अभाव, रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी आवश्यक ट्राफिक पोलिसच रस्त्यावरून गायब झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
 कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालय ते भांडेवाडी यादरम्यान वाहतुकीची कोंडी होत आहे. सोमवारी आठवडे बाजारच्या दिवशी सर्वाधिक ट्रॅफिक जॅम असते. रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या वाहनांमुळे रहदारीस अडथळे येत आहेत. सोमवार वगळता कर्जतमध्ये वाहतूक पोलिस कार्यरत असलेले दिसत नाहीत. रस्त्यावर लावण्यात आलेले फळ विक्रेत्यांची स्टॉल्सही वाहतुकीस अडथळा आणत आहेत. वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या दुचाकींवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ती होताना दिसत नाही, अशी तक्रार नागरिकांमधून होत आहे.


  कर्जत शहरातील वाहतूक समस्येची अनेक कारणे आहेत. अपुरे रस्ते, रस्त्यांची दुरावस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ, वाहतुकीतील शिस्तीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे वाहतुकीची समस्या बिकट झाली आहे. ती सोडविण्यासाठी नव्याने वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करून त्याची कायमस्वरूपी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
 - पप्पूशेठ धोदाड
माजी उपसरपंच, कुंभेफळ

अनेक प्रतिष्ठित लोकच आपली चारचाकी वाहने बेवारसपणे कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर लावून कामासाठी निघून जातात. पोलिसांकडून अशा लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. अनेक व्यवसायिकांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत आहे. पोलिसांनी ठोस पावले उचलून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
 - विनायक ढवळे
सहसचिव, कर्जत तालुका प्रेस क्लब

कर्जतमध्ये काही लोक मनगटशाहीचा वापर करून वाहतुकीच्या नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करीत आहेत. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र पोलीस कसलीच भूमिका घेत नसल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

- तानाजी रमेश तोरडमल
बहिरोबावाडी, ता.कर्जत


'बायपास' साठी खा.विखे प्रयत्नशील
 वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी कर्जतमध्ये बायपास रस्त्याची गरज आहे. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातलेले आहे. बायपासला आवश्यक भूसंपादन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.