Breaking News

देशभरात भाजपला उतरती कळा

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भूपेश बघेला यांचे मत

नवी दिल्ली
देशभरात गेल्या अनेक महिन्यापासून भाजपचा जनाधार घटत चालला आहे. मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होऊ लागला आहे.  महाराष्ट्रातील निकालातून भाजपला उतरती कळा लागल्याचे स्पष्ट मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या दोघा मुख्ˆयमंत्र्यांनी व्यक्त केले.
भूपेश बघेल म्हणाले, भाजपच्या राजकारणाला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकाल हे टर्निंग पॉईंट होते. आता झारखंडमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसेल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी आमचे नेते आहेत. आमची धोरणे स्पष्ट आहेत. छत्तीसगढ आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच विजय झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, देशात आता बदल होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील निकालातून हे दिसून आले आहे. झारखंडमध्ये काय होते हे सुद्धा दिसेलच. जर सरकार काम करीत नसेल, तर त्यांना विरोधामध्ये बसावेच लागेल. लोकांमध्ये आता बदलाची भावना निर्माण झाली आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनमत तयार होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षाला पुन्हा यश मिळू लागले आहे. पंजाबमधील चार पैकी तीन पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्या मतदारसंघातही काँग्रेसने विजय मिळवला आहे. लोकांचा अजूनही काँग्रेसवर विश्‍वास आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.