Breaking News

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात १५ विद्यार्थ्यांसह चालक, मुख्याध्यापक व शिक्षक जखमी संगमनेर/प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी.जे.खताळ माध्यमिक विद्यालयाच्या बसला तळेगाव दाभाडेनजीकच्या तोमाठणे फाट्याजवळ आज (बुधवार) पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात बसच्या चालकासह १५ विद्यार्थी, मुख्याध्यापक एक शिक्षक जखमी झाले आहेत. या सर्वांवर तळेगाव दाभाडेतील पवना रुग्णालयात उपचार सुरु असून एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजली आहे.
  या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून अपघाताची माहिती मिळताच सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. तर काहींनी थेट तळेगाव दाभाडे जवळ गेले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी.जे.खताळ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील ९१ विद्यार्थ्यांची सहल राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस मधून अलिबाग येथे गेली होती. दिवसभर अलिबाग, मुरुड, जंजीरा आदी पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर परतीच्या प्रवासात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वांनी पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जून्या मुंबई-पुणे महामार्गाने बस क्र.एमएच.१४ बीटी ४१२८ मधून एकुण ४४ विद्यार्थी संगमनेरच्या दिशेने निघाले. त्यांची बस तळेगाव दाभाडेनजीकच्या तोमाठणे फाट्याजवळ आली असता चुकीच्या दिशेने एक मालट्रक सरळ बसच्या दिशेने येत असल्याचे बसचे चालक नईम रफीक शेख यांनी बघितले.
मात्र समोरुन येणार्या मालट्रकचा आणि बसचा वेग अधिक होता. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध बंद अवस्थेत उसाने भरलेली डबल ट्रॅक्टर ट्रॉली चालकाला दिसली. अशा परिस्थितीत चालक नईम यांनी बसचा वेग नियंत्रणात आणला आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन आदळण्यापेक्षा उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ४४ विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जीवदान मिळाले. बसने ट्रॉलीला समोरुन धडक मारल्याने यात चालक शेख स्वतःही जखमी झाले. यावेळी अचानक आदळल्याने बसमधील काही विद्यार्थी, शिक्षक आणि मुखयध्यापकांना किरकोळ मार लागला.
 अपघाताची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसही घटनास्थळी हजर झाले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीने नजीकच्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी असलेल्या सर्वांवर तळेगाव दाभाडे येथील पवना रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना संगमनेरला पाठविण्यात आले आहे.