Breaking News

राहाता तहसीलवर मुस्लीम बांधवांचा मोर्चा
राहाता/ प्रतिनिधी ः
नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, अशी घोषणाबाजी करत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राहाता तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. वीरभद्र मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
     या मोर्चामध्ये दलित बांधव व आंबेडकरवादी समाजही सहभागी होते. अखंड भारताचा नारा देत मोर्चात सहभागी झालेल्या हजारो तरुणांनी केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला.
     तहसील कार्यालय परिसरात झालेल्या सभेमध्ये काही जणांनी भाषण केले. मौलाना अब्दुल रौफ, काँग्रेसचे सुरेश थोरात, राष्ट्रवादीचे रणजित बोठे, आर.पी. पी. चे. प्रदीप बनसोडे, सिमोन जगताप यांचे भाषण झाले.
  तहसीलदार कुंदन हिरे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्य घटनेच्या 14 व 15 या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला समान मानण्यात येते. धर्म जातीच्या आधारे भेदभाव करता येत नाही.
 परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक संविधानाच्या भावनेचे उल्लंघन करणारे आहे.
आम्ही हे असंविधानिक आणि काटेकोर विधायक नाकारू, आमच्या महान देशातील सर्व न्यायप्रेमी आणि धर्मनिरपेक्ष निरक्षर लोकांनी एकत्रितपणे आवाज उठवावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.  अप्रामाणिक कायद्याद्वारे होणारा अन्याय आणि जातीयतेला आळा घालण्यासाठी आपल्या सन्माननीय राष्ट्रपतींनी आपल्या चांगल्या पदाचा वापर करावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या विधेयकात आसाम 1985  कायद्याचेही उल्लंघनदेखील करण्यात आले आहे. जे आसाममधील परदेशी लोकांच्या अटकेसाठी कट-ऑफ तारीख म्हणून निश्‍चित करते. या करारास अनियंत्रितपणे रद्द केल्यास उत्तर-पूर्व भागात शांततामय वातावरण विस्कळीत होईल, याकडेही तहसीलदारांचे लक्ष वेधण्यात आले.
      मोर्चामध्ये मौलाना याहिया, शेख अब्दुल, मौलाना रफिक, मौलाना इब्राहिम, मौलाना युसुफ, नगरसेवक सलीम शहा, मुन्ना फिटर, प्रदीप बनसोडे, शहा मुश्ताक, अली इलियास शहा आदींसह राहता तालुक्यातील मुस्लीम बांधव तसेच दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष भोये यांनी बंदोबस्त ठेवला होता.