Breaking News

भाजप सरकारविरोधात शनिवारी फ्लॅग मार्च


संगमनेर / प्रतिनिधी ः
केंद्रातील भाजप सरकारविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 28 डिसेंबरला सकाळी मुंबई येथे भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅ ग मार्चचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
थोरात यांनी सांगितले की,  केंद्रातील भाजप सरकारची कृती लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी आहे. ते देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्तीस्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव यावर केंद्र सरकारने आघात केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते. तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकारविरोधात स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे, असे थोरात म्हणाले.
केंद्र सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध करण्यासाठी व तरूण, विद्यार्थी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असा भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढणार आहे. राज्यभरातही विविध ठिकाणी फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहेत. हजारो काँग्रेस कार्यकर्ते या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, असेही थोरात यांनी सांगितले.