Breaking News

काश्मीर खोर्‍यातून सात हजार जवान माघारी


नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370  रद्द केल्यानंतर जवळपास चार महिने उलटले आहेत. काश्मीरच्या खोर्‍यात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या हजारो निमलष्करी दलाच्या जवानांना माघारी बोलवण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. निमलष्करी दलाच्या जवानांच्या 72 तुकडीतील 7 हजार जवानांना माघारी बोलवण्यात आलं आहे तसेच या जवानांना त्यांच्या मूळ कर्तव्याच्या जागी  पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (आरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलिस आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी)च्या तुकड्यांना जम्मू-काश्मीरमधून माघारी बोलवण्यात येणार आहे. यापूर्वी निमलष्करी दलाच्या 20 तुकड्यांना माघारी बोलवण्यात आलं होतं त्यांना डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात आसामध्ये तैनात करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये कायदा व सुवस्था राखण्यासाठी ऑगस्ट ते स्पटेंबर या काळात निमलष्करी दलाच्या 70 अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या, यात 75 हजार जवानांचा समावेश होता. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं  कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. येथे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यानंतर काश्मीर खोर्‍यात संचारबंदीसह इतरही निर्बंध लागू करण्यात आले होते.