Breaking News

श्रीक्षेत्र अकलापूरची जमीन अखेर देवस्थानकडेच १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ट्रस्टच्या बाजूने निकाल संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या अकलापूर येथील दत्त देवस्थान ट्रस्टच्या इनामी जमिनी संदर्भातील वाद अहमदनगरच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी निकाली काढला. मालकी हक्कासंदर्भात धर्मदाय आयुक्तांनी देवस्थान ट्रस्टच्या बाजूने नोंद करण्याबाबत आदेश दिल्याने विश्वस्त मंडळात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या दहा वर्षापासून हा वाद सुरू होता. संगमनेरमधील पठार भागासह मुंबई, पुणे, नाशिक, नगर आदी जिल्ह्यातून हजारो भाविकांचे हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी रामा ठका बगाड, लक्ष्मण ठका बगाड, एकनाथ बाबु बगाड यांच्याकडे देवस्थान ट्रस्टची २३ एकर २१ गुंठे एवढी जमीन होती. त्यापैकी आठ एकर जमिनीची ट्रस्टची मिळकत म्हणून नोंद केली केली गेली होती. उर्वरित १५ एकर जमीन देवस्थानची असून ती खासगी असल्याचे दाखवत नोंदणी अर्जातून वगळण्यात आली होती.
सदर जमिनीची ट्रस्टची मिळकत म्हणून नोंद व्हावी, यासाठी अकलापूर देवस्थानचे विश्वस्त संपत सयाजी आभाळे, वसंत दशरथ आभाळे यांनी नगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात २००९ मध्ये चेंज रिपोर्ट सादर करत अपील दाखल केले होते. त्यावेळेपासून हा न्यायालयीन लढा सुरू होता. दहा वर्षानंतर अकलापूर कामगार तलाठी साईनाथ ढवळे यांनी इनाम जमिनीसंबंधी असणारी सर्व कागदपत्रे धर्मदाय आयुक्तांकडे सादर केली. या प्रकरणात त्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. गटनंबर ६१५ ६१७ या जमिनीमधील एकूण २३ एकर २१ गुंठे एवढे क्षेत्र देवस्थान ट्रस्टच्या मालकीचेच आहे अशा आदेश पारित करत तशी नोंद कागदोपत्री करण्याचे आदेश नगरच्या धर्मदाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता बनकर यांनी दिले आहेत.