Breaking News

राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडाःमुख्यमंञ्याचे पोलीस दीक्षांत सोहळ्यात आवाहन

नाशिक : मी आणि तुम्ही एकाच बॅचचे आहोत असे जिव्हाळ्याचे उदगार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिक येथे दीक्षांत सोहळ्यात प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांचा सेवेतील उत्साह वाढवणारे मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आज ते प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले होते. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांचे उत्कृष्ट संचलन पाहून ते थक्क झाले. मी एक महिन्यांपूर्वी पदाची शपथ घेतली आणि तुम्ही सर्वांनी आज सेवेची शपथ घेतली .त्यामुळे आपल्यात फारसा फरक नाही . सेवेत येण्याची शपथ घेतांना भ्रष्टाचाराचा बिमोड करा आणि जनतेच्या सेवेसाठी सज्ज व्हा . तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रार करणाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आजच्या दीक्षांत सोहळ्यानंतर तुमच्यावर या संपूर्ण राज्याच्या जनतेच्या संरक्षणाची खुप मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकार आणि मी मुख्यमंत्री या नात्याने तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. तुमच्या साठी असलेल्या नवीन योजना आणण्यासाठी माझा प्रयत्न नक्की असेल आणि त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासु देणार नाही. आज अनेकांनी ह्या अकादमीतून खडतर प्रशिक्षण घेतले आहे यामुळे तुमच्या कष्टाचे चीज झाले आहे असे मला वाटते .आता सर्व जग बदलत आहे तलवार ही आपल्या महाराष्ट्राची शान आहेच त्यात शंका नाही पण इथुन पुढच्या काळात तुमच्या हातात संचलन करतांना तलवार नव्हे बंदुक दिसली पाहिजे . आज तुम्ही केलेल्या संचलनाने मी भारावलो आहे. इथुन पुढच्या काळात तुमच्या खांद्यावर राज्यातील जनतेच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी आहे आणि ती तुम्ही यशस्वी पणे पार पाडाल याची मला खात्री आहे असे सांगत त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना  प्रोत्साहन दिले.