Breaking News

पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाइनला गळती


भिंगार/प्रतिनिधी : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनला गळती लागून लाखो लिटर पाण्याचा  अपव्यय होत आहे. पाणी गळतीची समस्या काही महिन्यांपूर्वीही झाली होती परंतु पुन्हा ही समस्या निर्माण झालेली आहे तरीही अद्यापपर्यंत ही पाणीगळती थांबविण्याकरीता प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार शहरातील खळेवाडी भागातील खळेवाडी ते पंपिंग स्टेशन रस्त्यावरील अनिल मटटु यांच्या वेल्डिंगच्या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दोन-तीन ठिकाणी फुटली होती. रस्त्यावर मध्यभागी खड्डे पडलेले असल्याने पाइपलाइन लिकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल व खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील खड्डे दिसण्यासाठी स्थानिक नागरिकांनी खड्ड्यांजवळ दगड ठेवलेले आहेत. अशा परिस्थितीमुळे नागरिकांना खड्डे चुकवून रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्यालगतच भिंगार हायस्कूल व रयत हायस्कूल असल्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना रस्ता पार करण्यास अडचणी येतात. रस्ता वर्दळीचा असल्यामुळे वाहनधारकांना देखील या प्रसंगातून जावे लागत आहे, अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यय चांगला नसून तो थांबवावा, अशी मागणी होत आहे. याबाबत एमआयडीसी येथील पाणी पुरवठा विभाग उपअभियंता एन.जे.राठोड यांच्याशी संपर्क साधला असता पाणी लिकेज दुरुस्तीबाबत भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे संपर्क साधावा, असे सांगितले. विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणारा त्रास वाचविण्यासाठी संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन पाण्याची गळती थांबवणे गरजेचे आहे, अशी मागणी शहरात जोर धरत आहे.