Breaking News

निर्भया प्रकरणी दोषी पवन गुप्ताची याचिका फेटाळली

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ता याची बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
गुप्ता याने बुधवारी न्यायालयात धाव घेतली होती. 2012 मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो, त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी त्याने मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक दोषी अक्षय कुमारसिंह याची फाशीच्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयानंतर निकालाचे पुनवरालोकन करण्यासाठी आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत त्याला देण्यात आली आहे.’निर्भया’ पॅरामेडिकलची विद्यार्थिनी होती. 16 डिसेंबर 2012 ला तिचे अपहरण करून बलात्कार करून तिला ठार करण्यात आले होते. या प्रकरणात 6 जण दोषी होते. यापैकी अल्पवयीन गुन्हेगाराला किशोर गुन्हेगारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. इतर पाच जणांपैकी एकाने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. तर, उर्वरित चौघांना न्यायालयाने 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. या 4 जणांना तत्काळ फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.