Breaking News

सरकारने मध्यम मुदतीचे कर्ज द्यावे सखाहरी उगले यांची मागणी


कोपरगाव/तालुका प्रतिनिधी ः
सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफीचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी मध्यम स्वरुपाचे कर्ज द्यावे. सरकारने दोन लाख रुपये कर्जमाफीची घोषणा केली. परंतु बहुतांश शेतकर्‍यांचे कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात पीककर्ज नसते. त्यामुळे राज्यसरकारने केलेली शेतकर्‍यांची कर्जमाफीची घोषणा सफल होणार नाही, असे मत संजीवनी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाहरी उगले यांनी मांडले.
  त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दोन लाख रुपये कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. त्यात फक्त पीककर्जाचा समावेश आहे.
राज्यातील शेतकर्‍यांचे पीककर्ज 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे असते. त्यात मध्यम मुदत कर्जाचा समावेश करण्यात आलेला नाही. ग्रामीण भागातील शेतकरी हे सायफन, बि-बियाणे- खतांसाठी, गाय खरेदी आदीसाठी कर्ज घेतात. या कर्जाचा यात समावेश झालेला नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहतील, असे उगले यांनी म्हटले आहे.
 या स्वरुपाच्या कर्जामुळे शेतकर्‍यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो.
याशिवाय शासनाने कर्जमाफी दिलेली आहे त्यातील काही शेतकर्‍यांची कर्जमाफीची रक्कम अजूनही खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वंचित राहणार आहेत. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ आदींमुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे. त्यामुळे तो कर्जफेड वेळेत करू शकलेला नाही. ज्या शेतकर्‍याने गाईसाठी कर्ज घेतले त्याचा एक हप्ता थकला तर तो कर्जमाफी योजनेस पात्र होत नाही. शिवाय कुठलाही शेतकरी दोन लाख रुपयापर्यंत पीककर्ज घेत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहिल.
त्यामुळे सरकारने कर्जमाफीयोजनेत मध्यम मुदत कर्जाचा समावेश करावा अन्यथा शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारीच राहील, असेही उगले यांनी निवेदनात नमूद केले आहे.