Breaking News

ट्रॅफिक कन्ट्रोल ब्रँच झालीय ‘कलेक्शन ब्रँच’! (भाग 1)

ऐतिहासिक अहमदनगर शहरात दिवसाआड भीषण अपघात होत आहेत. निरपराध लोक यात अपघातांत नाहक बळी जात आहेत. मात्र ज्या शासकीय यंत्रणेकडे ही जबाबदारी आहे, त्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी पोलीस निरीक्षक मोरे हप्तावसुलीतच मग्न आहेत. शहर आणि परिसरात प्रवासी करीत असलेल्या रिक्षा, स्कुल बसेस, लक्झरी आदींसह अवजड वाहनांच्या माध्यमातून या शाखेत दरमहिन्याला सुमारे 40 लाख हप्ता जमा होतो, अशी धक्कादायक माहिती हाती ’दैनिक लोकमंथन’च्या आली आहे. हप्तेवसुलीच्या नादात या शहराच्या वाहतुकीचा अक्षरश फज्जा उडाला आहे. त्यामुळेच या वस्तुस्थितीची शहराच्या जनतेला माहिती व्हावी, यासाठी आजपासून ’नगरी ट्रॅफिक’चा फज्जा’ ही वृत्तमालिका सुरु करत आहोत.   

-  मुख्य संपादक

बाळासाहेब शेटे
अहमदनगर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेत जे अधिकारी आणि कर्मचारी काम करताहेत, त्यापैकी ठराविक कर्मचारीच नेमून दिलेल्या फिक्सपॉईंटवर दिसतात. बाकीचे कर्मचारी शेंडी बायपास, विळद बायपास, पत्रकार चौक, नगर-सोलापूर रोड, नगर- पुणे रोड, नगर-औरंगाबाद रोड, नगर- मनमाड रोड या परिसरात शहराची हद्द नसतानादेखील परप्रांतातून येत असलेल्या अवजड वाहचालकांकडून नियमाच्या गोंडस नावाखाली हप्ते गोळा करत आहेत. यामध्ये ठोकळ आणि गवळी या दोन पोलीस कर्मचार्‍यांचा सर्वात जास्त पुढाकार आहे. या दोन कर्मचार्‍यांची नावे ड्युटी तक्त्यावर ज्या फिक्सपॉईंटला असतात, त्या फिक्सपॉईंटवर हे दोन कर्मचारी कधीच दिसत नाहीत. कायम अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून ’चिरीमिरी’ वसूल करण्यातच हे दोन पोलीस कर्मचारी व्यग्र असतात. सक्कर चाकातून स्वस्तिक चौकामार्गे दिल्लीगेट आणि दिल्लीगेटहून पत्रकारचौकामार्गे सावेडी, तारकपूर, टीव्ही सेंटर, गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, एकविरा चौक, श्रीराम चौक, निर्मलनगर, वसंत टेकडी त्याचप्रमाणे भिंगार, मुकूंनगर, केडगाव आदी भागांत प्रवासी वाहतूक करत असलेल्या रिक्षांचे कलेक्शन करण्याची जबाबदारी या दोन कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आलेली आहे. अवजड वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी यापूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी 11 ते 5 या वेळेत अवजड वाहनांना शहर हद्दीत प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र सकाळी अकरानंतर शहरात आलेल्या अवजड वाहतुकीने यापूर्वी झालेल्या अपघातांत अनेकांचा बळी घेतला आहेत. सामान्य माणसे मेली रस्ता अपघातांत मेली तरी चालतील. पण प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतुकीतून होणारे ’कलेक्शन’ कमी होणार नाही, याची काळजी घेण्यातच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे बळ खर्ची होत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी अवजड वाहतूक करणार्‍या मालट्रकचा पाठलाग करताना एका पोलीस कर्मचार्‍याचा बळी गेलेला आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दबंगगिरीमुळे सामान्यांना त्रास देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांविषयी जनतेत प्रचंड रोष आहे, त्यामुळेच वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांना संतप्त तरुणांकडून मारहाणीचे प्रकार या शहरात वरच्या वर होत आहेत. त्यामुळेच गुन्हेगारी आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असलेल्या या जिल्ह्याला एका नव्या खमक्या आणि डॅशिंग डीएसपीची खरी गरज आहे. असे डीएसपी कधी येतात, याची शहरसियांसह तमाम जिल्हावासीय चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.     

प्रभारी वरिष्ठ लक्ष देतील का? 
शहर वाहतुकीच्या ढिसाळ नियोजनामुळे शहर वाहतुकीचा फज्जा उडाला असताना कोणाचा कोणाला मेळ राहिलेला नाही. वाहतुकीला शिस्त राहिली नाही, वाहतूक नियमांचे पालन करायला कोणी तयार नाही. सिग्नल पडण्याचीही कोणी वाट पहायला तयार नाही. प्रत्येकाला घाईत पुढे जाण्याची घाई असल्याने फिक्सपॉईंटवर उभ्या असलेल्या पोलीसदादाकडे फारच थोड्या लोकांचे लक्ष असते. विशेष म्हणजे अनेकवेळा पोलीस कर्मचारी फिक्सपॉईंटवरून गायब असतात. आज दि. 11 दुपारी बाराच्या सुमाराला स्टेट बँक चौक आणि मार्केटयार्ड चौकात तासभर पोलीस कर्मचारीच नव्हते. चांदणी चौक आणि कोठी चौकात तर कर्मचारीच नसल्याने या भागांत अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व परिस्थितीवर प्रभारी पोलीस अधिकारी सागर पाटील हे लक्ष देतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

... तर आमच्याशी संपर्क साधावा
रिक्षा, स्कुल बस आणि प्रवासी वाहतुकीमध्ये कार्यरत असलेल्या छोट्या व्यावसायिकांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचा हप्त्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून नगर जिल्ह्यात चित्र पाहायला मिळत आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. वाहतूक नियमांचा शहर आणि परिसरात फज्जा उडालेला असताना वाहतूक सुरक्षा सप्ताहदेखील कागदावरच राहिला आहे. कर्जाच्या हप्त्यातून खचलेल्या छोट्या व्यावसायिकांना बँकेच्या हप्त्याबरोबरच पोलिसांनाही हप्ते द्यावे लागत आहेत. वाहनाचे हप्ते आणि पोलिसांना हप्ते दिल्यावर घरी काय न्यायचे, या विवंचनेत हे छोटे व्यावसायिक सापडले आहेत. मात्र यापैकी कोणाला पोलीस जास्तच त्रास देत असतील तर आमच्याशी मो. नं. 9763032275, 8530071499 संपर्क साधावा, असे आवाहन ’दैनिक लोकमंथन’चे मुख्य संपादक अशोक सोनवणे यांनी केले आहे.