Breaking News

कावळा बनलाय कुटुंबियांतल्या सदस्यासारखाच लाडका


अनिल रणभोर
राहाताः 
कावळ्यांची संख्या कमी झाल्याने पिंडाला मोठ्या मुश्कीलीने कावळा शिवत असल्याचे प्रकार आपण पाहिले, ऐकले आहेत. परंतु राहाता येथे एक कावळा एका हॉटेलचालकाकडे आणि लॉन्ड्रीचालकाकडे कुटुंबातला सदस्य असल्यासारखा खातो, पितो. आपण आल्याचा आवाजही तो या दोन दुकानचालकांना नित्यनियमाने देतो. या दोघांनाही त्याने चांगलाच लळा लावला आहे. तो या दोघांचा लाडका बनला आहे.
राहाता येथे अन्वर तांबोळी यांचे हॉटेल यादगार आणि संजय रंधे यांचे लॉन्ड्री दुकान आहे. यादगाव हॉटेलवर रोजच एक कावळा मागील काही दिवसांपासून नित्याने येत आहे. तो दुकानाच्या छतावर पत्र्यावर बसतो. आपण आल्याचा संदेश तो दुकानदाराला देतो. चोचीने तो जोरजोराने पत्रा वाजवतो. त्यानंतरही हॉटेल मालकाचे त्याच्या कडे लक्ष गेले नाही तर तो जोरजोरात काव काव करतो. मला भूक लागलीय... मी आलोय... हे सांगण्याकरिता तो पत्र्यावर थयथयाट करतो. शेवटी हॉटेलचालकाला या कावळ्याला खायला द्यावेच लागते. या कावळ्याने या हॉटेलचालकाला लळाच तसा लावलाय.
आपल्या कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीला द्यावा तसा या कावळ्याला शाकाहार किंवा मांसाहार दिला जातो. या कावळ्याचे लाड तरी किती तर त्याला बेसन पापडीची खायला घातली जाते. हा कावळाही एखाद्या माणसासारखा मोठा खवय्येगिरी करणार आहे. तो हट्ट करु लागला की जेवण न घेता फक्त बेसन पापडीची हक्काने मागणी करतो. हॉटेलचालकही त्याचा हा हट्ट पुरवतात.
कावळ्याचा रुबाबही पाहण्यासारखा आहे. तो बाटली वगळता इतर पाणी पितच नाही. त्याला बाटलीबंद पाणीच चालते. येथे ताव मारल्यानंतर तो संजय लॉन्ड्री यांच्या दुकान समोर एका झाडावर जाऊन बसतो. तेथेही त्याची बसण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे. तो संजय रंधे यांना आवाज देत आपण आल्याचे संकेत देतो. मग रंधे त्याला कधी पापडी तर कधी बिस्किटे देतात.
हा कावळा चितळी रस्त्यावरील हॉटेल यादगार आणि जवळच असलेल्या लॉन्ड्रीवर येत नाही असा दिवस उगवत नाही. परंतु या दोन दुकानदारांचे दुकान ज्या दिवशी बंद असते त्या दिवशी त्यांनाच चुकल्यासारखे वाटते. आपल्या जिवाभावाचं कोणीतही न भेटल्याची हुरहूर त्यांना लागून राहते.
पक्षी अशुभ नसतात...
परमेश्‍वराने निसर्गाच्या रूपाने आपल्याला खूप मोठी अनमोल देणगी दिलेली आहे. प्राणी, फळे, फुले, पक्षी यासह निसर्गातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. ते मानवाने जपणे गरजेचे आहे. पक्षी कुठलाही असो त्याला जीव लावला तर तो आपला जिवलग बनतो. आम्ही रोज कावळ्याची भूक व तहान भागवितो. या कावळ्याने मोठा लळा लावलाय, असे सांगतानाच हॉटेलचालक अन्वर तांबोळी आणि लॉन्ड्रीचालक  कुठलाही पक्षी शुभ व अशुभ नसतो, हे सांगायलाही विसरत नाहीत.