Breaking News

शेतकर्‍यांना कर्जमुक्तीसोबत चिंतामुक्तही करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही


औरंगाबाद ः शेतकरी हा एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत असतो. आम्ही शेतकर्‍याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कर्जमुक्तीसोबतच शेतकर्‍यांना चिंतामुक्तही करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. औरंगाबादमध्ये महाएक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
राजकारण्याला घर पेटवणे सोपे, पण घरातली चुल पेटवणे कठिण असल्याचे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  उद्योगाबरोबरच कृषी क्षेत्रातही आपले प्राधान्य आहे. आपल्या उद्योजकांमध्ये बळ आहे. देशाचे लक्ष वेधेल असे हे एक्स्पो आहे. उद्योजकांना खंबीर करणारे हे सरकार असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय एक्स्पो करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.उद्योजकांसमोर अनेक अडचणी आहेत. अडचणींचा सामना करून उद्योजकांनी मोठे विश्‍व उभे केले आहे. जर त्यांच्यासमोरील अडचणी दूर केल्या तर उद्योजक आणखी मोेठे विश्‍व उभारू शकतील, असे ठाकरे यावेळी म्हणाले. आम्ही संकटावर मात करून हे सरकार उभे केले आहे. उद्योजकांना प्रेरणा देणारे हे सरकार असेल. देशात, जगात, देशात आर्थिक मंदी आहे म्हणून रडत बसलो तर आपण लढू शकणार नाही आणि रडणारे तसे नीट जगूही शकणार नाही. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.