Breaking News

अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावा अन्यथा 'भारिप' आणि 'वंचित'चे आंदोलन


अहमदनगर / प्रतिनिधी
जिल्हा पुरवठा कार्यालय अन्नधान्य वितरण कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात याव्यात, या मागणीचे भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे सागर भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, सुनील शिंदे, सागर ठोकळ, सिद्धार्थ घोडके, मेहेर कांबळे, अक्षय पाथरीया, शुभम बेडकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, की याठिकाणी शहरातील विविध समाजातील नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येत असतात.  त्यावेळी कार्यालयांमध्ये कुठल्याही एका धर्मातील देव देवतांच्या प्रतिमा असतील तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये देवदेवतांचे फोटो लावता महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात याव्या, असा शासनाचा आदेश आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या गेल्या नाहीतर कार्यालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्याला काळे फासतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.