Breaking News

‘बर्ड हेल्पलाईन’द्वारे जखमी पक्ष्यांना मदत

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा निसर्गप्रेमी संघटना, जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र तसेच पर्यावरण मित्र आदींच्या प्रयत्नांतून सन 2003 सालापासून दरवर्षी संक्रांत काळातील पंधरवड्यात व पुढे वर्षभर बर्ड हेल्पलाईनद्वारे जखमी पक्ष्यांवर उपचार करून निसर्गात मुक्त केले जाते. 5 जानेवारी ते 16 जानेवारी या कालखंडात जिल्ह्याभरात मांजात अडकून जखमी झालेल्या 14 पक्ष्यांवर उपचार केले गेले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयराम सातपुते यांनी दिली. 
स्वत:साठी व आपल्या पिलांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर पडलेले असंख्य पक्षी या महिनाभरात पतंगाच्या विशेषत: नायलॉन मांजामुळे घायाळ होऊन मृत्युमुखी पडतात अथवा जखमी होतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी निसर्गप्रेमींच्या बर्ड हेल्पलाईन या उपक्रमामध्ये आता अनेक नवीन निसर्गप्रेमी जोडले जात आहेत. यावर्षी ‘बर्ड हेल्पलाईन’मध्ये जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार वाघुंबरे, ऋषिकेश परदेशी, दीपक साळवे, संदीप राठोड, सचिन चव्हाण, प्रतीम ढगे, अजिंक्य सुपेकर, फरहज मिर्झा, भैरवनाथ वाकळे, ऋषिकेश लांडे, ओंकार बेद्रे, ओंकार इंगळे, हितेश ओबेरॉय, युवराज नवले आदींनी योगदान दिले.
वंचक, कोकीळ, खंड्या, शिक्रा, बगळा, रॉबीन, पारवा, पाकोळी, कापशी या प्रजातींच्या एकूण 14 पक्ष्यांपैकी 11 पक्षांवर यशस्वी उपचार केले गेले. शहरी भागात मोठ्या संख्येने निवास करणार्‍या ‘पारवा’ या पक्ष्यांची संख्या जखमींमध्ये 5 एवढी होती. दुर्मिळ पक्ष्यांमध्ये गणले जाणारे जखमी गव्हाणी घुबड मृतावस्थेत सापडल्यानेही निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. खंड्या, शिक्रा, कापशी या अन्नसाखळीतील महत्वाच्या स्तरांवरील पक्ष्यांना वाचविण्यात कार्यकर्त्यांना यश आले.
या सर्व जखमी पक्ष्यांना निसर्गप्रेमी टिमपर्यंत पोहोचविण्यासाठी अजिनाथ भडके, मंगेश धर्माधिकारी, सचिन अकोलकर, वनिता चिलका, मनीषा कासार, मेघा भालेराव, विनायक डुकरे, प्रशांत कदम, हर्ष सोलंकी, धीरज कराचीवाला आदींनी मदत केल्याने त्यांचे संघटनेकडून आभार मानण्यात आले.