Breaking News

स्वच्छता मोहिमेची महापौरांकडून तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी :  महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मंगळवारी सकाळी  पहिल्या मजल्यावर असलेले महापौर व उपमहापौर कार्यालय, स्थायी समिती कार्यालय, नगर सचिव कार्यालय व संगणक विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सामुदायिक स्वच्छता अभियानाची पाहणी केली.
औरंगाबाद रस्त्यावरील कोठला बसथांबा परिसरात ही मंडळी स्वच्छतेत गर्क असताना अचानक या मंडळींना भेटून वाकळेंनी त्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला. ’स्वच्छता प्रामाणिकपणे करा व काही अडचणी असतील तर सांगा’, असेही सांगितले. तसेच रस्त्यात कोणी कचरा टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाईही करण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेच्या 23 विभागांना शहरातील 23 ठिकाणे वाटून देऊन रोज सकाळी 8 ते 10 या वेळेत तेथे सामुदायिक स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर व उपमहापौर कार्यालय तसेच स्थायी समिती कार्यालय, नगरसचिव कार्यालय व संगणक विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे एकत्रित स्वच्छता अभियान कोठला परिसरात सुरू होते. तेथे वाकळेंनी भेट दिली.  मंगळवारी सकाळीच त्यांनी शहरभर फिरून महापालिका कर्मचारी स्वच्छता अभियानात आहेत की नाही, याची पाहणी केली.