Breaking News

खाकी वर्दीतला घरभेदी !जम्मू काश्मीरमधील अलीकडच्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी रोजी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांचा कट भारतीय लष्कराने उधळून लावत दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. मात्र यामागे जम्मू काश्मीरमधील पोलिस उपअधीक्षकांची मदत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमागे असणार्‍या स्थानिकांची मदत होत असल्यामुळे दहशतवाद्यांना हल्ले करणे सोपे जात असल्याचे दिसून येते. भारतीय सुरक्षा दलांच्या जवानांनी ताब्यात घेतलेले पोलिस उपअधीक्षक देविंदर हिजबुल, नविद आणि आसिफ अहमद या दहशतवाद्यांना ठिकाणांची माहिती देण्यासाठी चंदीगड घेऊन जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी इरफान अहमद मीर हा गाडी चालवत होता. पोलिसांनी कुलगाम जिल्ह्यातील महामार्गावर त्यांना रोखले होते. इरफान पाचवेळा पाकिस्तानला जाऊन आला आहे. इरफान-देविंदर दहशतवाद्यांना घातपात करण्यासंदर्भात मदत करत होते का? यासंदर्भात देखील त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सदर पोलिस उपअधीक्षक दहशतवाद्यांना मिळाला होता की एखाद्या ऑपरेशनचे प्लॅनिंग करत होता. हा देवेंद्र सिंह तोच व्यक्ती आहे. ज्याच्यावर संसद हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप दोषी अफजल गुरुने लावला होता. देवेंद्र सिंह चार दिवस सुट्टीवर होते.
सुट्टीच्या दरम्यान देवेंद्र श्रीनगरपासून जम्मू आणि चंदीगड जाणार होते. परंतु पोलीस तपासात जेव्हा त्यांच्या गाडीला रोखण्यात आले तेव्हा तैनात अधिकार्‍याने आपली ओळख विचारली. परंतु त्यानंतर जेव्हा कारमध्ये बसलेल्या लोकांची चौकशी केली गेली तेव्हा ते दोन हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी होते. एकाचे नाव हिज्बुल कमांडर सईद नवीद आणि दुसरा रफी हैदर होता. हा खुलासा झाल्यानंतर देवेंद्र सिंहसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षकाचे वीर पदक काढून घेणे ही सामान्य प्रक्रिया आहे. अशा प्रकरणात कठोर कारवाईची शिक्षा आहे. जर देविंदर सिंह दोषी सापडले तर त्यांच्यावरील कारवाई देखील एखाद्या दहशतवाद्याप्रमाणेच केली जाईल. गुप्तचर विभाग आणि लष्करी संस्था देविंदर यांची चौकशी करत आहेत. त्यानंतर दहशतवाद्यासह देविंदर सिंह त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे देविंद्र काही वर्षांपासून दहशतवाद्यांना मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. मोठी रक्कम घेऊन तो दहशतवाद्यांसाठी काम करायचा असेही तपासातून समजत आहे. त्याच्या संपत्तीची देखील चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मात्र यानिमित्ताने जम्मू आणि काश्मीर प्रांतातील दहशतवादी कारवाया आणि त्यांना स्थानिकांची होणारी मदत हा महत्वाचा मुद्दा आहे. देशाच्या अंतर्भागात सुरू असलेल्या दहशतवादाला आयएसआयचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे देशाची हजारो शकले पडताना दिसत आहेत. लष्कराच्या जवानांचे शौर्य आणि एकनिष्ठता यामुळे दहशतवादी आणि घुसखोरी यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. परंतु जम्मू आणि काश्मीरला याचा फायदा करून घेता आलेला नाही ही देशाच्या हिताच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. स्वतंत्र काश्मिरच्या मुद्दयावरून फुटीरतावाद्यांनी पुन्हा उचल खाल्ली हेाती. मात्र केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून, जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकला आहे. तसेच तेथील राज्य सरकार बरखास्त असल्यमुळे, तेथील कारभार केंद्र सरकार पाहत आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांना अनेक जीवनावश्यक सोयी-सुविधांना मुकावे लागत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्यामुळे तेथील दहशतवाद निपटून काढण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. फुटीरतावाद्यांनी नेहमीच इथल्या तरुणांचा फायदा घेतला आहे. इथला तरुण वर्ग आक्रमक होऊन रस्त्यावर येऊन दगडफेक करतो, कारण त्याला रोजगार नाही. येथील बाजारपेठ बंद असल्यामुळे त्याच्या कामाला हात नाही. अशावेळी फुटीरतावादी नेते हजार पाचशे रुपये देऊन, या मुलांना दगडफेक करायला लावतात.
बाजारपेठा, दुकाने, शाळा आणि कार्यालये बंद अशा अवस्थेमध्ये इथले स्थानिक जगत आहेत. किंबहुना त्यांना असे जगावे लागत आहे. सुरक्षा अधिकार्‍यांवर, लष्करी अधिकार्‍यांवर फेकलेले दगड यामुळे अनेक निष्पाप जीव जखमी होत आहेत. या तरुण वर्गाला भडकवण्याचे काम फुटीरतावादी नेते करत आहेत. फुटीरतावाद्यांना हवालाच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. तरुणांकडून घडलेल्या केवळ दगडफेकीमुळे केंद्र राखीव पोलिस दलाचे सुमारे 1300 जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाच्या यशाचा आढावा घेणेही इथे गरजेचे आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये होणार्‍या चकमकीमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात नाही, हे सुरक्षा दलांचे यश आहे. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढा देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर ज्या उपाययोजना राबवित आहे त्यांच्या पाश्वभूमीवर आपल्या लष्कराची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी लष्कर ड्रोन विमाने, फायटर विमाने, प्रचंड हिंसाचार घडवणार्‍या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या शस्त्रास्त्र वापरामुळे आजवर तीन लाख स्थानिकांना आपल्या घरादारावर पाणी सोडायला लागले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एवढया मोठया प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर कधीच झालेला नाही. राष्ट्रीय रायफल्सने आजवर अनेकदा दहशतवाद्यांच्या सशस्त्र हल्ल्याला तोंड दिले आहे. याशिवाय राज्यातील बंडखोरी मोडून काढली आहे.