Breaking News

जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे आणि अस्मिता भिल्लारे यांनी घेतले मोहटादेवीचे दर्शन


टाकळीमानूर /  प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत सणांना परंपरेनुसार वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्व आहे. मकरसंक्रांत धर्माच्या आधारावर साजरी केली जाते. बुधवारी मकरसंक्रांतीनिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे व अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी हजारो महिला भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
हिंदू महिन्यानुसार पौष शुक्ल पक्षात सूर्य धनुराशीतून मकरराशीत प्रवेश (संक्रमण) करतो. त्यामुळे मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून वसंतऋतूला सुरुवात होते. खरीप पिकांची कापणी होऊन रब्बी पिकांना अंकुर फुटतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्वाचा असतो. मकरसंक्रांतीनिमित्त मोहटादेवी गडावर आलेल्या हजारो भाविक महिलांनी या सुगीत शेतात पिकवलेल्या ज्वारी, गव्हाच्या कणसांच्या ओंब्या, तीळ-गूळ, गाजर, बोरे याने देवीला औसा (औक्षण) केले. यावेळी महिलांनी हळदी-कुंकू करून वाण वाटले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे व अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते देवीला तिळाचे विविध अलंकार, विविध पुष्पांचे हार, तिळांच्या लाडवाचा नैवेद्य समर्पण करून लघुरुद्राभिषेक करण्यात आला. यासाठी कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री क्षेत्र पैठण येथून ११ ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते. देवस्थान समितीच्यावतीने आलेल्या भविकांसाठी मोफत चहापाणी, महाप्रसाद याचे वाटप करण्यात आले. खास करून महिलांच्या गर्दीने गड फुलून गेला होता. यावेळी नगर येथील भाविक अमोल सामन व मनोज शर्मा यांनी हलव्यांच्या दागिन्यांची देवीस सजावट केली. यावेळी संस्थांनचे विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी भाविकांचे स्वागत केले.