Breaking News

पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांनी आधार पडताळणी करा : तहसीलदार वाघ


कर्जत : प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नावनोंदणी केलेली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांकडून अद्यापही आधार पडताळणी करण्यात आलेली नाही. आधार पडताळणी केल्यास पहिला हप्ता मिळालेला असला तरी या पुढील हप्ता थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन कर्जतचे तहसीलदार सी.एम.वाघ यांनी केले आहे.
ते म्हणाले, आधार पडताळणी आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच सेतु केंद्राकडे उपलब्ध आहेत. १० रुपये भरून आधार पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी २५ जानेवारी २०२० पूर्वी ही पडताळणी करून घ्यावी. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत यादीचे वाचन केले जाणार आहे. या यादीत चूक आढळून आल्यास गावातील तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्या निदर्शनास आणुन द्यावे, असे आवाहन तहसीलदार वाघ यांनी केले आहे.