Breaking News

जामखेड एसटी डेपो वर्कशॉपमध्ये असुविधा


जामखेड/ प्रतिनिधी ः 
जामखेड एसटी डेपो परिसरात असलेल्या वर्कशॉपमध्ये  असुविधा आहेत. यामुळे वर्कशॉप कामगारांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत कामगारांकडून अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या. तसेच अनेकवेळा प्रस्ताव देऊनही प्रशासनाकडून काहीच दखल घेण्यात आलेली नाही.
 याबाबत आता आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, असे साकडे कर्मचार्‍यांनी निवेदनाद्वारे घातले आहे.
जामखेड हे चार जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले शहर आहे. येथील बसस्थानक पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. मराठवाड्यातील सर्व बसेस जामखेडमार्गे पुणे- मुंबई या भागात मोठ्या प्रमाणात जातात. यामुळे येथे बस व प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. स्थानिक डेपोसह अनेक डेपोच्या नादुरूस्त बसेस जामखेडच्या डेपोत येतात. जामखेड आगारात सध्या 345 वाहक, चालक कर्मचारी आहेत. 53 वर्कशॉप फिटर म्हणून कार्यरत आहेत.
जामखेड आगाराच्या एसटी डेपोच्या आवारात 1991 मध्ये डांबरीकरण झाले होते. तेव्हापासून अद्याप कसलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण आगाराचा आवार धूळ, माती, खड्ड्यांनी भरलेला आहे. दुरवस्था झालेल्या शौचालयाची मलसाठवण टाकी अनेक वर्षांपासून उघडीच आहे. त्या दुर्गंधीमूळे कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस दुरूस्तीच्या फ्लोअरचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे काम करताना अडथळा निर्माण होत आहे. शेजारीच वाहक, चालक व स्टाफची इमारत आहे.तिथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु वर्कशॉप कामगारांना स्वखर्चाने पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. रात्रपाळीच्या कामगारांना सकाळी हातपाय धुण्याची देखील सोय नाही.