Breaking News

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात अवघ्या दोन महिला कर्मचारी


भिंगार / प्रतिनिधी
शहरात नागरिकांना नागरी सुविधा देण्याचे काम  भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड पाहते. त्या नागरी  संविधापैकी एक सुविधा  हॉस्पिटल आहे. सुविधा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल असून त्या हॉस्पिटलमध्ये सावळागोंधळ सुरू आहे. हॉस्पिटल आहे, परंतु रुग्णवाहिका नाही. महिलांसाठी डिलिव्हरी वाॅर्ड नाही. दोन वर्षांपासून तीन डॉक्टरची आवश्यकता असताना दोनच डॉक्टर काम पाहतात. तिसऱ्या डॉक्टरची अद्यापही नियुक्ती झालेली नाही.
या हॉस्पिटलबाबत अजून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. ३६ बेडची क्षमता असलेल्या हॉस्पिटलमध्ये दिवसा वाॅडबाॅय,  डॉक्टर , सिस्टर, आया आदी कर्मचारी काम करतात. परंतु  रात्रपाळीमध्ये वॉचमन आणि वॉर्डबॉय नाही. फक्त दोनच महिला कर्मचारी काम पाहतात. त्यापैकी एक आया आणि दुसरी सिस्टर हे महिला काम पाहतात. फक्त दोन महिला कर्मचारी ३६ बेडच्या रुग्णालयात आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. प्रशासनाकडे मागणी करूनही गेल्या तीन वर्षांपासून हॉस्पिटलला रात्रपाळीत  वाॅचमन वाॅडबाॅय नाही.  इमर्जन्सी पेशंट आल्यानंतर उपचारार्थ त्यांना दाखल करणे, आरोग्य  सुविधा देणे किंवा ट्रान्सफर करण्यासाठी रात्र पाळीमध्ये दोन महिला धावपळ कशी काय करणार? हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीत तिथे फक्त दोनच महिला असल्यामुळे त्यांना भीती वाटत असूनही जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे  मागणी करूनही अद्यापही ती मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. एखादी अघटित घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा एखादा अघटीत प्रकार घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, या प्रश्नांची उत्तरे कोण देणार, अशी कुजबूज हॉस्पिटलमधे दाखल होणाऱ्या रुग्ण भिंगारकर नागरिकांमध्ये सुरु आहे.