Breaking News

शेवगाव-गेवराई रस्त्याची चाळण


चापडगाव / प्रतिनिधी ः
शेवगाव- गेवराई राज्यमार्गाची खड्ड्यांनी चाळण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते. परंतु हे खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकही नाहीत. धोकादायक वळणे असूनही या वळणावर धोक्याची सूचना देणारे लावलेले फलक गायब झाले आहेत. या मार्गावरील पुलावरींल गार्ड स्टोनही गायब झालेले आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या नसल्याने वाहने रस्त्याच्या खाली घेताना अनेकवेळा अपघात होत आहेत.
 सध्या साखर कारखाने सुरु आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉली, उसाचे भरलेले ट्रक या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. अवैध वाहतूक करणार्‍या रिक्षांचीही या रस्त्यावर चांगलीच गर्दी असते. हे वाहनचालक रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बर्‍याचवेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. ठाकूर - पिंपळगाव येथील पुलावर आतापर्यंत बरेच अपघात झाले आहेत. अनेकांचा यामध्ये जीव गेला आहे.
 परंतु या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात संबंधित विभागाने स्वारस्य दाखवलेले नाही. या राज्यमार्गावरील खड्डे प्रशासनानाने बुजविण्याची मागणी चापडगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी धोकादायक वळणे आहेत तेथे योग्य सूचना देणारे फलकही बसवावेत अशी मागणी आहे.