Breaking News

'सिटी ट्रॅफिक कंट्रोल'च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 'डोके ठिकाणावर आहे का'? पो. नि. मोरेंची 'एसआयटी' मार्फत चौकशी करा ; भारिप बहुजन महासंघाची मागणी


अहमदनगर / बाळासाहेब शेटे / mo. 7028351747. 
शहराच्या वाहतुकीचा फज्जा उडालेला असताना आणि सातत्याने होत असलेल्या अपघातांत कोणाचा कोणाचा बळी जात असताना शहर परिसरात प्रवाशी वाहतूक करत असलेल्या प्रत्येक रिक्षाचालकांकडून सक्तीने पाचशे रुपये हप्ता घेणाऱ्या वाहतूक नियंत्रण शाखेचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल उपस्थित करत शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव दिलीप साळवे आणि शहर महासचिव सुनील शिंदे यांनी 'दैनिक लोकमंथन'शी बोलतांना केली.
ते म्हणाले, या शहरात आतापर्यंत अनेक अपघात झाले असून कित्येकांचा मृत्यू झाला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. असे असतानादेखील या शाखेचा कारभार अद्यापही सुधारत नाही. वरिष्ठांनी केलेल्या कारवाईचादेखील हे अधिकारी आणि कर्मचारी बोध घेणार नसतील तर दोष कोणाचा म्हणावा? दस्तुरखुद्द शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाजवळ पत्रकार चौकात टँकरच्या धडकेत एका तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला. या अपघातात चूक कोणाची, हा मुद्दा गौण असून या शाखेच्या कार्यालयाजवळील चौकात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत अपघात होत असतांना शहर वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी या चौकात का नेमण्यात आला नाही. शहर परिसरात ट्रिपल सीटवरून जाणारे, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलत भरधाव वाहने चालविणे असे करणाऱ्या उद्दाम वाहनचालकांना वाहतूक नियंत्रण शाखा दंडात्मक कारवाई का करत नाही, हा खरा प्रश्न आहे. एरवीयाला पकड’, ‘त्याला पकड’, ‘फाड पावती’, असा खाक्या दाखविणारे पोलीस बेशिस्त वाहनचालकांना एक तर धडाही शिकवित नाही, किंवा त्यांचे प्रबोधनदेखील करत नाही. त्यामुळे या शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात फक्त पावती फाडून पैसा गोळा करणे, हा एवढाच हेतू असल्याचे स्पष्ट होते. 
नगर शहर आणि परिसरात हजारो सिक्षाचालक प्रवाशी वाहतूक करत आहेत. यातील बहुतेकांकडे रिक्षाची कागदपत्र आहेत, बॅच, बिल्ला आणि गणवेशदेखील आहे. मात्र तरीही रिक्षाचालकांकडून या शाखेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा हप्ता मिळतो. ज्या रिक्षाचालकाकडे कागदपत्र आदी नाही, त्या रिक्षाचालकाकडून प्रत्येकी एक हजार रुपये हप्ता दिला जातो. रिक्षाचालक गरीब आणि त्यांना कोणाचे पाठबळ मिळत नसल्याने ते मुकाटपणे नाविलाजस्तव या शाखेच्या पोलिसांना हप्ता देतात. वास्तविक पाहता न्यायालयाच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहनांची कागदपत्र तपासता येत नसली तरी या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना अडवून कागदपत्र मागितली जातात, ड्रायव्हिंग लायन्सन्स मागितली जातात आणि हे सारं नसले, की अखेरचा झटका असतोच 'फाड पाचशेची पावती'. शहर वाहतूक शाखेचे अनेक पोलीस त्यांची हद्द नसतांनादेखील नगर-सोलापूर, नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-औरंगाबाद आदी महामार्गांवरुन ये-जा करत असलेल्या जीप, ट्रक, कंटेनर, लक्झरी बसेस आदी वाहनांच्या चालकांना बारीकसारीक त्रुटी काढून दमदाटी देत पाचशे, हजार रुपये घेतात. हा सारा पैसा हा या शाखेचे पोलीस नक्की कोणाला देतात, यातील पैसे दंड म्हणून न्यायालयात जमा केले जातात का, या सर्व लाखो रुपयांचा या शाखेकडे हिशोब आहे, सरकारी ऑडिटरमार्फत या पैशांचे ऑडिट होते का, या शहर वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांना ग्रामीण भागात महामार्गांवर उभे राहून किंवा वेळप्रसंगी वाहनांचा पाठलाग करून ती अडविण्याचा अधिकार आहे का, हे असे असंख्य प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.
या शाखेला माहिती अधिकार कायद्याद्वारे उघडे पाडू!
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आतापर्यंत किती जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली, त्या कारवाईतून या शाखेकडे आतापर्यंत किती रुपयांचा महसूल गोळा झाला, या महसुलाची या वाहतूक शाखेने नक्की काय आणि कशी विल्हेवाट लावली, हा सारा महसूल कुठे आणि कोणाच्या बँक खात्यात जमा करण्यात आला, साधारणपणे दुचाकी वाहनांना दंड किती आणि चारचाकी वाहनांकडून किती दंड आकाराला जातो, या शाखेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी किती जणांना भायखळा, मुंबई येथून प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, आरटीओ आणि शहर वाहतूक शाखा यांच्या कार्यकक्षा नक्की कोणत्या या आणि अशा अनेक मुद्द्याची या शाखेकडे आम्ही माहिती मागविणार आहोत. यामुळे या शाखेत सुरु असलेले हप्तवसुलीचे गौडबंगाल सामान्य जनतेसमोर येईल. या कायद्याच्या आधारे वाहतूक नियंत्रण शाखेला लवकरच उघडे पाडणार आहोत.
सुनील शिंदे, शहर महासचिव, भारिप महासंघ.