Breaking News

महाराजांच्या नावाचा राजकारण्यांकडून सोयीसाठी वापर माजी खासदार उदयनराजे यांची टीका


पुणे : राज्यात महाशिवआघाडी स्थापन केल्यानंतर त्यातील शिव का काढले. असा सवाल करत,  राज्याचा खेळखंडोबा केला, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी टीका छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.
मागच्या जन्मी माझ्याकडून किंचित का होईना पुण्याचे काम झाले असावे म्हणून माझा छत्रपती शिवरायांच्या घराण्यात जन्म झाला. हे माझे सौभाग्य असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. महाराजांचे विचार आचरणात आणले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखे धावलो नाही. सत्ता काय चाटायची आहे का? सर्व पक्ष
सोयीप्रमाणे महाराजांच्या नावाचा वापर करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच शिवाजी महाराजांची अजून किती मानहानी करायची ते ठरवा, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्वार्थाने एकत्र 
आलेली लोकं फार काळ एकत्र राहत नाहीत. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते आपापल्या मार्गाने निघून जातात’, अशी टीका त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली आहे. शिवाजी महाराजांनी कधी स्वत:चे 
घर भरले नाही. राजेशाही असती तर मी एकाही माणसाला उपाशी राहून दिले नसते. लोकशाही अंमलात आणली तर तसं लोकशाहीच्या राजाने सुध्दा वागले पाहिजे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.