Breaking News

पुणतांब्यात शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा उभारणार शिवस्मारक समितीची स्थापना


पुणतांबा/ प्रतिनिधी ः
येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्याचे नियोजन आहे.
 येथील स्टेशन रस्त्यावर मुख्य वेशीवर शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारावा ही ग्रामस्थांसह शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु त्यासाठी लागणारा खर्च आणि मुख्य वेशीच्या पडझडीमुळे या विषयावर कोणीही बोलण्यास तयार नव्हते. परंतु सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 12 लाख रूपये खर्च करून मुख्य वेशीचे बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी केली जात होती.
        यासाठी डॉ. धनवटे यांच्यासह अनेकांनी संमती दर्शवली होती. यावर नुकतीच शिवस्मारक समिती स्थापन करण्यात आली. आता मुख्य वेशीवर शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 40 लाख खर्च अपेक्षित असल्याचे समितीचे अध्यक्ष दत्ता धनवटे यांनी सांगितले. यासाठी लागणार्‍या खर्चाची वर्गणी गावातून जमा करण्यात येईल. यानंतर वर्षभरात पुतळा उभारण्याचा प्रयत्न असणार असल्याचे धनवटे यांनी सांगितले. शिवसेना नेते सुहास वहाडणे यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात 51 हजार रोख शिवस्मारक समितीच्या सदस्यांकडे दिले.