Breaking News

सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकास शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी; माजी उपसभापतीविरोधात गुन्हा दाखल




कोळगाव/प्रतिनिधी
 खातेदार तसेच त्याची सही, अंगठा नसताना बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून माजी पंचायत समिती उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोळगाव येथील शाखेतील व्यवस्थापक व रोखपाल यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तशी फिर्याद बँकेचे व्यवस्थापक रोहन उबाळे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून नलगे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला.
 याबाबत सविस्तर असे की दिलेल्या फिर्यादी नुसार श्रीगोंदे पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे हे बबन बाबा मोहरे यांच्या समवेत बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँकेच्या कोळगाव शाखेत आले व त्यांनी बबन मोहरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या  खात्यातून रक्कम रुपये ७०० काढण्यासाठी पावती भरून दिली. मात्र त्यावर खातेदाराचे सही किंवा अंगठा नसल्याने बँकेचे व्यवस्थापक उबाळे यांनी खातेदार समक्ष हवे किंवा आजारी असल्यास तसा वैद्यकीय दाखला द्यावा किंवा आमच्या कर्मचार्‍याला त्यांची सही घेण्यासाठी प्रत्यक्ष पाठवतो असे सांगितले. याचा नलगे यांस राग आला व त्यांनी उबाळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी रोखपाल पोपट सरोदे हे मध्ये आले असता नलगे याने त्यांनाही शिवीगाळ करत त्यांच्यावर चप्पल उगारली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे करत आहेत.