Breaking News

मोटारी चोरीप्रकरणी संशयित चोराला अटक


पाथर्डी/ प्रतिनिधी ः
अभिजित खंडागळे
चोरीच्या विकलेल्या मोटारीच्या पैशाच्या वाटणीवरून चोरट्यांमध्ये वाद झाला आणि त्यांनी केलेली चोरी उघडकीस आली. शेतकर्‍यांनी एका संशयित चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या चोरट्यासह पाच जणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 तालुक्यातील पूर्व भागातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांच्या  विहिरींवरील विद्युतपंप चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शेकटे , भुतेटाकळी, कोरडगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांना याचा फटका बसला. त्यांच्या पानबुडी विद्युत पंपांवर चोरांनी डल्ला मारला आहे.
चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध घेत असतानाच एका शेतकर्‍याला एका टोळीमध्ये पैशाच्या वाटणीवरून वाद झाल्याचे लक्षात आले. या घटनेची चर्चा परिसरात झाल्यानंतर शेतकर्‍यांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी संशयित पाच चोरट्यांच्या नावानिशी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आपल्या नऊ हजार रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक पानबुडी मोटर चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबर परिसरातील इतर शेतकर्‍यांच्याही  इलेक्ट्रिक मोटार चोरी गेल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. विष्णू घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी रामनाथ बाबुराव घुले, रामकिसन हरिभाऊ घुले, शरद कालिदास घुले, मारुती साहेबराव घुले (सर्व राहणार शेकटे), सयाजी महादेव केदार (राहणार निपाणी जळगाव) यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सयाजी केदार याला शेतकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोमनाथ बांगर पुढील तपास करत आहेत. संशयित सयाजी महादेव केदार याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.