Breaking News

उत्कृष्ट खेळातून 'संजीवनी'ला राष्ट्रीय पातळीवर पोहचविले : कोल्हे बेसबाॅल स्पर्धेत 'संजीवनी'चे चैतन्य आणि विराज


कोपरगांव / ता. प्रतिनिधी
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ  इंडिया या संस्थेमार्फत बिलासपूर, छत्तीसगड येथे घेण्यात आलेल्या १७ वर्षाखालील  मुलांच्या ६५  व्या राष्ट्रीय  बेसबाॅल स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमीच्या चैतन्य नानासाहेब लोंढे व विराज हिरालाल जांगडा यांनी आखिल भारतीय सी. बी. एस. ई. बेस बाॅल संघातुन उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  करीत या संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली आणि संजीवनी अकॅडमीला राष्ट्रीय  पातळीवर पोहचविले, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे, की या सामन्यांमध्ये प्रत्येक राज्याचा प्रत्येकी एक संघ व संपुर्ण भारतातील सी. बी. एस.ई. पॅटर्नच्या शाळांचा मिळुन एक संघ असा समावेश  असतो. चैतन्य आणि विराज यांची सी. बी.एस.ई. च्या संघात निवड झाली होती. या संघाने उपांत्यपूर्व फेरीत हरीयाना संघावर १-० अशा  गुणांनी विजय मिळविला. उपांत्य फेरीत दिल्ली संघाचा ३-१ अशा  गुणांनी विजय नोंदवुन अंतिम फेरीत प्रवेश  केला. अंतिम सामन्यात या संघाने मध्यप्रदेशच्या संघाशी  निकरीची झुंज देत १-० अशा  गुणांनी विजयश्री खेचुन आणला आणि सुवर्ण पदकाची कमाई केली. यात संजीवनी अकॅडमीच्या चैतन्य आणि विराजने संजीवनीतुन मिळालेल्या शास्त्रशुध्द प्रशिक्षणाच्या जोरावर भारतीय सी. बी. एस. ई. संघास सुवर्णपदक मिळवुन देऊन संजीवनी अकॅडमी राष्ट्रीय  पातळीवर पोहचविले आणि संजीवनी खेळात सुध्दा आघाडीवर असल्याची मोहर उमटविली. राष्ट्रीय  स्तरावरील सुवर्णपदकप्राप्तीबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी खेळाडू चैतन्य आणि त्याचे वडील नानासाहेब लोंढे, आई सीमा लोंढे आणि दुसरा खेळाडू विराज आणि त्याचे वडील हिरालाल जांगडा, आई वर्षा  जांगडा यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्या सुंदरी सुब्रमण्यम, उपप्राचार्या सीमा मोहंती व क्रीडा प्रशिक्षक  विरूपक्ष रेड्डी उपस्थित होते.