Breaking News

माउलींच्या मंदिरात सुवासिनींची गर्दी  नेवासे/ प्रतिनिधी
 मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये सुवासिनींनी  दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी हजारो महिलांनी माऊलीस वाणाचे दान करून दर्शन घेतले. मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने नेवासा शहरातील मंदिरे गर्दीने फुलून गेली होती.
 सकाळ पासूनच पंचक्रोशीतील महिलांनी वाण ववसा घेऊन संत ज्ञानेश्वर माउली मंदिर प्रांगणात दर्शनासाठी गर्दी केली होती. माउली दर्शनावेळी महिला सुवासिनींनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रांगणातील भगवान दत्तात्रयांच्या मंदिरासमोर महिला सुवासिनींनी एकमेकींना हळदीकुंकू लावून वाण देऊन तिळगुळ कार्यक्रम केला. नेवासा शहरातील विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर तसेच नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या मंदिरातही सुवासिनींनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने नेवासा शहरात उत्साह दिसून येत होता. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असा संदेश देऊन पुरुषांनी गळाभेट घेत तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या.