Breaking News

शेळ्या चोरीने शेतकरी धास्तावले


टाकळीभान / प्रतिनिधी
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान परीसरात चोरीचे सत्र सुरूच असून आता शेळ्या चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने शेळी पालक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. आतापर्यंत झालेल्या चोर्‍यांचा  तपास लावावा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मटणाचे भाव भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी शेळ्या चोरीचा सपाटा लावला असून गेल्या आठ दिवसात सुमारे दहा ते बारा शेळ्या चोरीस गेल्या आहेत. टाकळीभान परीसरात भुरट्या चोरांचा उपदव्याप सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी किराणा दुकान, मोबाईल शाॅपी फोडण्याचे प्रकार वाढले होते. तर शेतकर्‍यांच्या शेतावरील पाण्याच्या मोटारी, स्टार्टर, केबल, ठिबक सिंचन संचाच्या पितळी चिमण्या हे शेती साहीत्य चोरी गेलेले आहे. सध्या बोकडाच्या मटनाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आसल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा शेळ्या चोरण्याकडे वळवला आहे. टाकळीभान परीसरात गेल्या आठ दिवसात दहा ते बारा शेळ्या चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. टाकळीभान येथील नेवासा रोडलगत रहाणारे मधुकर रणनवरे यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्या, एकनाथ रणनवरे यांच्या दोन शेळ्या, तुकाराम बोडखे यांचा बोकड रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरुन नेला आहे. गावात अवैध धंदे वाढले आहेत. त्यामुळे            चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून टाकळीभान पोलिस ठाण्याच्या निष्क्रिय पोलिसांच्या बदल्या कराव्यात आणि जबाबदार पोलिसांनी झालेल्या चोर्‍यांचा तपास लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.