Breaking News

नेवाशातील बेकरीचालक, मालकांचा गुरुवारपासून संप कच्च्या मालाची भाववाढ झाल्याने निर्णय


नेवासे/प्रतिनिधी ः
बेकरीच्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने बेकरी व्यवसाय अडचणीत आला आहे. कच्च्या मालाच्या भाववाढीच्या निषेधार्थ नेवासे तालुक्यातील बेकरीचालक व मालक 16 जानेवारीपासून बेमुदत संप करणार आहेत.
  या संदर्भात नेवासा फाटा येथे नुकतीच बेकरीचालक व मालक यांची बैठक झाली. मैदा, तेल व बेकरी उत्पादन तयार करणार्‍या कच्च्या मालाची भाववाढ झाल्याने बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यामुळे बेकरी व्यवसायावर मोठे संकट उभे राहिले. या भाववाढीच्या निषेधार्थ नेवासे तालुक्यातील बेकरी व्यवसाय करणार्‍या चालक, मालकांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला.
बैठकीप्रसंगी इम्रान पटेल, तय्यब पटेल, दत्तात्रय शिरसाठ, रामलाल यादव, अय्याज शेख, नजीर शेख, हुसेन शेख यांच्यासह बेकरीचालक व बेकरी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या वर्षी मैदा गोणी एक हजार रुपयांना होती. आता तिच गोणी दीड हजार रुपये झाली आहे. तूप, तेल, लाकडी इंधन याचेही भाव वाढल्याने या दरवाढीमुळे होलसेल भावांमध्येही दरवाढ करण्यात येत आहे, बेकरी चालक, मालक यांनी सांगितले.