Breaking News

जामखेड पंचायत समितीत गुलाल राजश्री मोरेंचा, पद मनिषा सुरवसेंना

 

 जामखेड/प्रतिनिधी

राजकीय दृष्टीने जिल्हयात चर्चेत असलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी राजश्री मोरे उपसभापतीपदासाठी मनिषा सुरवसे यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. परंतु अर्ज छाननी पूर्वीच मोरे यांनी सभापतीपदाचा अर्ज माघारी घेतला. त्यामुळे उपसभापतीपदी मनीषा सुरवसे यांची निवड झाली परंतु आता सभापतिपद काही काळ रिक्त राहणार असल्याने सभापतिपदाचा पदभार सुरवसेंकडेच राहणार आहे.
  राजकीय उलथापालथ डावपेचांच्या खेळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूर्यकांत मोरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून भाजपच्या वर्चस्वाला झुगारत जामखेड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या पत्नी विद्यमान उपसभापती राजश्री मोरे यांच्या सभापतीपदाला सुचक सुभाष आव्हाड यांनी तर भाजपा तालुकाध्यक्ष रवि सुरवसे यांच्या पत्नी मनिषा सुरवसे यांच्या उपसभापती पदाला सुचक म्हणून भगवान मुरूमकर यांनी सह्या केल्या होत्या. परंतु 7 जानेवारी रोजी होणारी निवडणूक तारखेस घ्यावी लागली होती.
 आता सभापतीपदासाठी अर्ज नसल्याने ती जागा रिक्त राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा अहवाल पिठासीन अधिकारी जयश्री माळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील त्यानंतर सभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया जाहीर केली जाईल. तोपर्यंत सभापती पदाचा कार्यभार नवनिर्वाचित उपसभापती मनिषा सुरवसे   सांभाळतील असे निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडप्रक्रिया पूर्ण जाहीर होण्याआधीच मोरेंच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत गुलाल उधळून आनंदोत्सवात साजरा केला होता. पण ऐनवेळी अर्ज माघारीमुळे त्यांना पदापासून वंचित राहावे लागले. सुरवसे यांच्याकडे अनायासे ते पद चालून आल्याने   गुलाल राजश्री मोरेंचा, पद मनिषा सुरवसेंना अशी चर्चा परिसरात रंगली होती.