Breaking News

बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही : नितीशकुमार


पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी जोरदार विरोध करत आंदोलने केल्यानंतर राज्यात एनआरसी लागू होणार नसल्याचे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी नितीशकुमार यांनी सार्वजनिक रित्या कोणतेही वक्तव्य केले नव्हते. अखेर नितीशकुमार यांनी एनआरसी बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  नितीशकुमार यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये हे दोन्ही कायदे लागू करण्यात येणार नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते आणि आमदार भाई वीरेंद्र यादव यांच्यासह अन्य आमदारांनी विधानसभेबाहेर जोरदार आंदोलन केले. या सर्व आमदारांच्या हातात एनआरसी आणि सीएए विरोधातील पोस्टर होते. भाजप संविधानाला संपवित आहेत. त्यामुळे आम्ही बिहारमध्ये सीएए-एनआरसीला लागू होऊ देणार नाही, असे आंदोलनकर्त्या आमदारांनी ठणकावले आहे. आमदारांच्या आंदोलनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्‍नच येत नाही. हे केवळ आसाम संदर्भातील मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे बिहारमध्ये लागू होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.