Breaking News

कोरठण खंडोबा यात्रोत्सवाला तीन लाख भाविक


कान्हूरपठार/ प्रतिनिधी ः
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाच्या तीन दिवसीय यात्रोत्सवाची रविवारी सांगता झाली. सुमारे तीन लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.
  यात्रेच्या मुख्य दिवशी रविवारी अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा व पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथील मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर या काठ्यांची लाखो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा करण्यात आली.
काठ्यांच्या देवदर्शन व कळस दर्शनानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर यात्रेची उत्साहात सांगता झाली. यात्रोत्सवादरम्यान सुमारे सहा लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. रविवारी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला सुमारे तीन लाख भाविक यात्रेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित होते.
     रविवारी पहाटेपासून देवदर्शनाला सुरवात झाली.  सकाळी नऊ वाजता खंडोबाची चांदीची पालखी व अळकुटी, बेल्हे, कांदळी, माळवाडी, सावरगाव घुले, कासारे कळस येथील मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक दुपारी बाराच्या सुमारास मंदिरासमोर आल्यानंतर पालखी मानकर्‍यांचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची शाही मिरवणूक सुरू झाली.  या मिरवणुकीत हजारो भाविकांची गर्दी झाली होती.
साडेतीनच्या सुमारास दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे व सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापूजा व महाआरती करण्यात आली.
 यावेळी पोलिस उपाधीक्षक अजित पाटील, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, सरपंच अशोक घुले, विश्‍वस्त मोहन घनदाट, किसन धुमाळ, अमर गुंजाळ, हनुमंत सुपेकर, चंद्रभान ठुबे, दिलीप घोडके, मनीषा जगदाळे, बन्सी ढोमे, देवीदास क्षीरसागर, किसन मुंढे, अश्‍विनी थोरात, साहेबा गुंजाळ, रामदास मुळे, जालिंदर खोसे, गोपीनाथ घुले, शांताराम खोसे, चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते.
 शासकीय महापूजा व महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन तर बेल्हे काठीने कळस दर्शन घेतले. यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका पार पडल्या. यात्रेदरम्यान धर्मादाय उपायुक्त हिरा शेळके, धर्मादाय सहाय्यक आयुक्त गिता बनकर, जनार्दन आहेर, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, तहसीलदार भारती सागरे, पत्रकार शिवाजी शिर्के, पारनेर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे  यांनी उपस्थिती लावली.



पुणे जिल्ह्यातील भाविकांचा उच्चांक
मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, येथील भाविक मोठ्या संख्येने कोरठणला आले होते. सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी चोख पोलिस बंदोबस्त केला होता. वाहतूक व्यवस्था सांभाळली प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी. तहसीलदार ज्योती देवरे यांनी नेटके प्रशासकीय नियोजन केले. क्रांती शुगर कारखान्याच्या सुरक्षा पथकाने सुरक्षा व्यवस्था सांभाळली. अळकुटी महाविद्यालय व जय मल्हार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाचे काम केले. भाविकांच्या सोयीसाठी एसटीकडून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.