Breaking News

शिवरायांसोबत तुलना करण्याचा भाजपचा अघोरीपणा

राज्यात 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत होता. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यालयात आजके शिवाजी नरेेंद्र मोदी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येत होते. पुस्तकांचे शिर्षक जर असे अघोरी असेल, तर त्यात आत भरलेले असेल, यावर विचारायलाच नको. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून, महाराष्ट्राचा हुंकार आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातून ध्वनित होते. महाराष्ट्रातील कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती हा शिवरायांच्या विचारांना सलाम करतो. शिवाजी महाराज हे एकमेवद्वितीय असे महापुरुष आहेत. असे असतांना त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करण्याचा अघोरीपणा भाजपने का करावा. जय भगवान गोयल, हे या पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी असे शीर्षर्क देऊन आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रदर्शन का मांडावे. असा प्रश्‍न जरी आपणा सर्वांना पडत असला, तरी गोयल ज्या मुशीत तयार झाले आहेत. त्यांच्याकडून अजून तरी काय अपेक्षा करणार. महाराष्ट्रातून या पुस्तकाला जोरदार विरोध झाल्यानंतर सोमवारी सदर पुस्तक मागे घेत असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. वास्तविक पाहता, भाजपच्या कार्यालयात या पुस्तकांचे प्रकाशन झाले, या कार्यक्रमाला भाजपचे खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते, तरी देखील या पुस्तकांचा आणि भाजपचा संबध नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र या पुस्तकांचा साधा निषेध करण्याचे औदार्य भाजपकडून दाखवण्यात आले नाही. तसेच यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक अवाक्षरही काढले नाही. पुस्तक मागे घेण्यात आले असले, तरी काही दिवसानंतर, महिन्यानंतर अशा घटना सातत्याने घडतांना दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करतांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन, स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यात हा आपला, तो परका, असा भेदभाव नव्हता. असे असतांना त्यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत करण्याची हिंमत गोयल का करू शकले. शिवराय या महापुरुषांची तुलना आपल्यासोबत केलेली खुद्द पंतप्रधान मोदी यांना देखील आवडले नसेल. असे गृहीत धरले, तर पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल एक अवाक्षरही अजूनपर्यंत काढलेले नाही. याउलट राज्यातील भाजप नेत्यांकडून या पुस्तकाबद्दल निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला नाही. याउलट भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा यांचा जाणता राजा उल्लेख कसा केला जातो, तसेच इंदिरा गांधी यांचा दुर्गा म्हणून केलेला उल्लेखाचे उदाहरण देण्यात येत आहे. मात्र सदर पुस्तकांचा भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी निषेध केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा या नेत्यांना पक्षनिष्ठा महत्वाची वाटते का. असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत आपली नापसंती दर्शवत पुस्तक बाजारात येऊ देऊ नये अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवराय यांचे वंशज असलेले संभाजी राजे हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार आहेत आणि भाजपाचे सदस्य सुद्धा आहेत. मोदींबाबत आदर आहे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे पण याचा अर्थ असा होत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत  त्यांची तुलना व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तर कुणाचीही तुलना होऊ शकत नाही.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याची खबरदारी घ्यावी की हे पुस्तक बाजारात येणार नाही. याचे कारण या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झाले आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसेच शिवेंद्र राजे यांनी देखील सुनावले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील टीका करत पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकार्यांना आवर घालण्याची विनंती आपण करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच नरेंद्र मोदींना मराठी माणसांच्या भावना माहित असल्याने हे करायला त्यांनी सांगितलं असेल, असं मला वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान राज्यातील शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत, आंदोलन आणि निदर्शने केली आहेत. आज मंगळवारी काँगे्रसच्यावतीने देखील राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहे. अशावेळी भाजपच्या नेत्यांनी पुढे येत हे पुस्तक आम्ही मागे घेत असल्याचा उदारपणा दाखवण्याची गरज होती. मात्र सदर पुस्तकांचा आणि भाजपचा संबध नसल्याचा दावाच भाजपच्या नेत्यांनी केल्याचे महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्रात जोरदार विरोध झाल्यानंतर सदर पुस्तक मागे घेण्यात आले. भाजपचे नेते जय भगवान गोयल लिखित ’आज के शिवाजीः नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक अखेर मागे घेण्यात आले असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. या पुस्तकाचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. संबंधित लेखकाने याबाबत माफी मागितली असून हा वाद आता संपला आहे, असे जावडेकर म्हणाले.