Breaking News

जगाला खरा गांधी कळूच दिला नाही ः सुरेश द्वादशीवार


गडचिरोली ः देशात विविध विचारप्रवाह आहेत. मात्र या विविध विचारप्रवाहांनी जगाला खरा गांधी सांगितला नाही; अशी खंत सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली. द ’गांधी समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दीड तासाच्या भाषणात द्वादशीवार यांनी ऐतिहासिक घडामोडी व जागतिक विचारवंतांचे दाखले देत श्रोत्यांना म.गांधी समजावून सांगितला. काळ बदलला तरी काही मूल्ये बदलत नाही. सत्य,अहिंसा ही अशीच मूल्ये असून, म.गांधी हे अशा मूल्यांचे प्रतिनिधी आहेत. गांधी हे अमर प्रकरण आहे. म्हणूनच आपण त्यांचा जयजयकार करतो आणि पुढची पिढीही तो करत राहील. म.गांधी हे सबंध जगावर आपलं गारुड कायम ठेवणारं व्यक्तिमत्व आहे, असे प्रा.सुरेश द्वादशीवार म्हणाले.
द्वादशीवार म्हणाले, गांधीजींवर एक लाख पुस्तके लिहिण्यात आली. युनायटेड एक्स्प्रेस या अमेरिकेतील नियतकालिकाने जेव्हा जगातील 10 हजार नागरिकांना प्रश्‍न विचारला; तेव्हा 8886 जणांनी म.गांधी हेच सर्वश्रेष्ठ होते, असे उत्तर दिले. म्हणूनच विचारवंतांबरोबरच आता कलावंतही गांधीजींचा विचार करु लागले आहेत. ’तुमच्या देशात म.गांधी झाले नसते तर माझ्यासारखा कृष्णवर्णीय माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला नसता’, असे बराक ओबामा भारताच्या संसदेत येऊन बोलून गेले. यावरुनही गांधीजींचे मोठेपण लक्षात येते, असे प्रा.द्वादशीवार म्हणाले.