Breaking News

एकाही लाभार्थ्यास धान्यापासून वंचित ठेऊ नका : आ. काळे कोपरगाव/प्रतिनिधी 
 शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डच्या (शिधापत्रिका) माध्यमातून अन्न-धान्य मिळालेच पाहिजे. ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही अशा नागरिकांचा सर्वे करून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करा. एकही लाभार्थी अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पुरवठा विभागाला केल्या.
 सर्व रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना रेशनकार्डवर शासनाकडून मिळणाऱ्या अन्न-धान्याचा नियमितपणे पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व रेशन दुकानदार व पुरवठा विभागाची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकी दरम्यान चर्चेवेळी ते बोलत होते. या बैठकीस तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, अजीज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, राहुल जगधने आदी मान्यवरांसह रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 ते पुढे म्हणाले की, रेशन दुकानदारांनी आपले रेशन दुकान नियमितपणे खुले ठेवावे जेणेकरून लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही. बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा योजनेतील लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असावी. कोपरगाव शहर व तालुक्यातील एकही रेशनकार्डधारक अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी रेशन दुकानदारांनी घ्यावी. रेशन दुकानात नागरिकांच्या तक्रारीसाठी ठेवण्यात आलेल्या तक्रार नोंदवहीची संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नोंद घ्यावी.त्या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करावे.