Breaking News

‘ट्रॅफिक’च्या ‘खाबूगिरी’ने ‘कलेक्टर’ शब्दाला काळीमा!


शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यापेक्षा ‘कलेक्शन’वरच नियंत्रण ठेवणार्‍या शासकीय यंत्रणेवर ‘दैनिक लोकमंथन’ने  शनिवार (दि.11) पासून ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरु केले आहे. अचानक झालेल्या ‘लोकमंथन’च्या या हल्ल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखा चक्रावून गेली आहे. त्यातच आम्ही केलेल्या आवाहनाला वाचकांनी इतका प्रतिसाद दिला, की या यंत्रणेविषयी किती छापावं, हा प्रश्‍न आम्हाला पडला. असो, आजच्या भागात या यंत्रणेचे आणखी कारनामे आणि निष्क्रियतेवर प्रकाश टाकत आहोत.

(बाळासाहेब शेटे)

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या अनेक अरुंद रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’ आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने या ऐतिहासिक शहरांतर्गतच्या रस्त्यावर ‘शिस्तपूर्ण वाहतूक’ स्वप्नातही पहायला मिळत नाही. मात्र असे दुर्दैवी चित्र असूनदेखील ‘ट्रॅफिक’च्या मोरे यांनी शहराच्या अनेक भागांत आपल्याच माणसांना ‘कलेक्टर’ केले आहे. कर्ज काढून घेतलेल्या रिक्षांद्वारे कसाबसा प्रपंच चालवित असलेल्या सरळमार्गी रिक्षाचालकांना ही मंडळ निष्कारण त्रास देत आहेत.  यामुळे ‘कलेक्शन’ एके ‘कलेक्शन’ हा एक कलमी कार्यक्रम हाती घेतलेल्या या ‘खाबूगिरी’मुळे ‘कलेक्टर’ या चांगल्या शब्दाला काळीमा फासली जात आहे.
शहरातील नवीपेठ, कापडबाजार, नालबंद खुंट, आडतेबाजार, दाळमंडई या भागांत ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. पारशाखुंट, गंजबाजार, मंगळवारबाजार या भागांत एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दाळमंडई, आडतेबाजार या भागांत अवजड वाहनांमुळे दुचाकी वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो. ही बाब ध्यानात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी लोखंडी पोल लावून अवजड वाहनांसाठी या भागांत प्रवेश करण्यास मनाई केली होती. मात्र त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. स्थानिक नागरिकांसह व्यापार्‍यांनी गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कंटाळून तक्रारी करण्याचेच सोडून दिले. परिणामी या भागांत आज पायी चालणे म्हणजे सर्कशीत काम केल्याप्रमाणे झाले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पो. नि. मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या ही गंभीर बाब आतापर्यंत ध्यानात कधी आलीच नाही. नागरिकांच्या जीवन-मरणाच्या या विषयांकडे कानाडोळा करत केवळ हप्तेखोरीचा जाहीर कार्यक्रम या शाखेत सुरु आहे. हा कार्यक्रम गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून अविरतपणे सुरुच आहे. ठोकळ, गवळीसारखे आणखी तीन चार लोक ’कलेक्शन’ची जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडत असून या लोकांना गरीब रिक्षाचालकांचा प्रचंड तळतळाट लागत आहे. हे रिक्षाचालक खासगीत बोलताना या लोकांना ‘कलेक्टर’ न संबोधता ‘दलाल’ किंवा ‘दल्ले’ या नावानेच ओळखतात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार रिक्षाचालक सहन करताहेत. कर्जाने घेतलेल्या रिक्षांचे हप्ते फेडता फेडता ‘ट्रॅफिक’च्या या लोकांचे खिसे भरताना घरी काय न्यायचे, चिल्या-पिल्यांना काय खाऊ घालायचे, या विवंचनेत अनेक रिक्षाचालक या ‘हप्तेखोरी’ला दररोज शिव्यांची लाखोली वाहत आहेत. ज्यांची कागदपत्रच नाहीत, बॅच आणि बिल्ल्याचा ठावठिकाणा नाही, अंगावर कधी खाकी अ‍ॅप्रन नाही, मात्र हप्ता अचूक वेळी पोहोच होतो, अशा रिक्षाचालकांना या शाखेकडून ‘जावया’सारखी वागणूक मिळते. मात्र ज्यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र आहेत, जे नियमाचे तंतोतंत पालन करतात, मात्र हप्ते देऊ शकत नाहीत, अशा रिक्षाचालकांना काहीही छोट्या मोठ्या त्रुटी काढून हप्त्यासाठी त्यांची अडवणूक करायची, असे धोरण या शाखेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून अवलंबविले जाते. अशा रिक्षाचालकांमध्ये या शाखेविषयी प्रचंड नाराजी आहे.

... तर ’ट्रॅफिक’च्या ‘खाबूगिरी’
विरोधात तीव्र आंदोलन 
आरटीओच्या अधिकारांवर अतिक्रमण करत वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करणे आणि सरळ सरळ वाहनांची चावी काढत ‘दबंग’गिरी करणार्‍या या शाखेच्या पोलिसांविषयी जनमानसात प्रचंड नाराजी आहे. या लोकांच्या हप्तेखोरीला कंटाळून काही रिक्षाचालकांनी आत्महत्यादेखील केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बँकेचे हप्ते फेडता फेडता नाकीनऊ आलेल्या रिक्षाचालकांना या लोकांचे खिसे भरण्यासाठी पोटच्या पोरांच्या गरजा कमी कराव्या लागत आहेत. केवळ ’खाबूगिरी’चाच कार्यक्रम करत असलेल्या ‘ट्रॅफिक’च्या विरोधात तमाम रिक्षाचालकांसह लवकरच तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल.
- मतीन सय्यद, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भिंगार,