Breaking News

स्वस्त रेशन धान्य दुकान दुसर्‍या दुकानात विलीन

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी त्यांच्या पदाचा बेकायदेशीररीत्या वापर केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, विनोद गाय
कवाड, दिलीप साळवे, लखन राठोड, मेहेर कांबळे, किरण जाधव, करण भोसले, रितीक लदे, विशाल साबळे, वैभव उमाप, शुभम ससाणे, अजय पगारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केडगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 76 हे बेकायदेशीररित्या दुकान क्रमांक 84 या दुकानात विलीन करण्यात आले. दुकान विलीन करण्याकरिता आवश्यक असणार्‍या कायदेशीर बाबींचे तंतोतंत पालन करण्यात आले नाही. वास्तविक कोणतेही स्वस्त धान्य दुकान हे इतर दुकानात विलीन करण्यासाठी अगोदर स्वस्त धान्य दुकान चालवणार्‍या व्यक्तीस कायदेशीररित्या नोटीस देणे आवश्यक आहे. नोटीसीमध्ये दुकान विलीन करण्याबाबतचे मुद्दे स्पष्ट व सविस्तरपणे नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुकान क्रमांक 76 विलीन करण्याअगोदर त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून खुलासा देणे आवश्यक झाले नाही. त्या कारणाने दुकान क्रमांक 76 चे मालक यांना त्यांचे म्हणणे न ऐकताच दुसर्‍या दुकानात विलीन करण्यात आले.
याबाबतचे संपूर्ण प्रकरण हे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी जाणीवपूर्वक बेकायदेशीररीत्या तसेच स्वत:च्या पदाचा गैरवापर करून  कारवाई केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलेली कारवाई ही कायद्याला धरून नाही त्याचप्रमाणे कायदेशीररित्या आवश्यक असणार्‍या सर्व बाबींचे उल्लंघन केले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कामकाज हे हुकुमी व जुलमी पद्धतीचे आहे. अधिकार्‍यांच्या  वागणुकीमुळे दुकान क्रमांक 76 चालकाचे मोठे नुकसान झाले व जाणीवपूर्वक ही बेकायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी हे त्या पदास योग्य नसून त्यांच्या विरुद्ध येत्या आठ दिवसांत चौकशी करुन कडक शासन करण्यात यावे अन्यथा मार्केट यार्डसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या सर्व पदाधिकारी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.